माळेगाव कारखान्यावर ऊस वाहतूकदारांना आरटीओचे मार्गदर्शन; वाहनांना रिफ्लेक्टर बसवून सुरक्षिततेचा संदेश
प्रतिनिधी:
ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूकदारांच्या सुरक्षिततेसाठी बारामती आरटीओ कार्यालयाच्या वतीने माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका कमी व्हावा, यासाठी वाहनांच्या पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर बसवण्यात आले तसेच सुरक्षित वाहतुकीबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी बारामती आरटीओ कार्यालयाचे असिस्टंट आरटीओ श्री. आर. एस. गावडे, असिस्टंट आरटीओ श्री. एम. एस. पाटील व भगत साहेब यांनी रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहून ऊस वाहतूकदारांना मार्गदर्शन केले. रात्रीच्या वाहतुकीदरम्यान वाहनांची दृश्यमानता वाढवणे, आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी सतर्क राहणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन दादा शेंडे, ज्येष्ठ संचालक तानाजी काका कोकरे, संचालक विलास भाऊ देवकाते, प्रतापराव आटोळे, सतीश आप्पा फाळके, रतन दादा भोसले, विजय आप्पा तावरे, देविदास गावडे, मच्छिंद्र मुलमुले, वकील कामगार संचालक शेखर आप्पा जगताप, मुख्य शेतकी अधिकारी लिंबोरे साहेब, ऊस पुरवठा अधिकारी ज्ञानेश तावरे, सिक्युरिटी ऑफिसर दीपक वाघ, अनिल जगताप, जगन्नाथ खोमणे, दिग्विजय गोडसे, राजेंद्र तावरे, स्वानंद शिंदे तसेच ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे व सहकारी वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ऊस वाहतूक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त करण्यासाठी आरटीओ कार्यालय व कारखाना प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात आलेला हा उपक्रम वाहतूकदारांसाठी उपयुक्त ठरला.




