माजी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर जाधव यांचे निधन; पोलीस दलात शोककळा..!
बारामती : माळी समाजातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी तथा माजी पोलीस महानिरीक्षक किशोर जाधव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह माळी समाज आणि त्यांच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
सन १९९५ ते १९९७ या कालावधीत किशोर जाधव यांनी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यकाळात बारामती उपविभागातील भोर, जेजुरी, सासवड तसेच बारामती परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
त्या काळात पोलीस अधीक्षक विक्रम बोके यांच्या नेतृत्वाखाली किशोर जाधव यांची जोडी शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे अधिकारी म्हणून विशेष गाजली होती. कनिष्ठ पोलीस कर्मचारी, अंमलदार तसेच प्रभारी अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहत असत.
जाधव यांच्या कार्यकाळातील अनेक घटनांच्या आठवणी त्यांच्या सहकाऱ्यांनी जागवल्या आहेत. माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका घटनेत रात्रीच्या वेळी सुमारे चारशे ते साडेचारशे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वसतिगृह प्रमुखावर हल्ला करून तोडफोड केली होती. त्यावेळी माहिती मिळताच किशोर जाधव यांनी स्वतः संपूर्ण उपविभागातील पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेतील बंदोबस्ताच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती आणि इंदापूर पोलीस ठाण्यावर मोठ्या जमावाने केलेली दगडफेक अशा अनेक प्रसंगी त्यांनी धडाडीने नेतृत्व करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. परिस्थिती हाताळताना त्यांनी कठोर आणि शिस्तबद्ध भूमिका घेतली होती.
किशोर जाधव यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी कार्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात उंचावण्यास मोठी मदत झाली. त्यांच्या कार्यकाळातील अनेक घटनांचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
किशोर जाधव यांचे पार्थिव सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी ए-२, सदनिका क्रमांक ४०५, स्प्रिंग व्हॅली, सीझन मॉलजवळ, हडपसर, पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी १० वाजल्यानंतर पार्थिव मानेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे नेण्यात येणार असून, तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पोलीस अंमलदार वृंद परिषद समिती, कोल्हापूर परिक्षेत्र–मुंबईचे श्री. अनिल उत्तम काळे यांनी दिवंगत किशोर जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि धडाडीच्या या आदरणीय अधिकाऱ्याच्या निधनाने पोलीस दलाची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि जाधव परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, साप्ताहिक भावनगरीच्या वतीने हीच भावपूर्ण श्रद्धांजली.




