मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

0
67

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

बारामती, दि.१४: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे; राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती पंचायत समिती येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्याच्या विकासाकरीता मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश केला आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’योजना, महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेसाठी एका वर्षाकरीता ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावे; ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरीता गावतील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरीता गर्दी करु नये. अर्ज करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकारण करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून ३ हजार रुपये १९ ऑगस्टपर्यंत (रक्षाबंधन) थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आजअखेर १ लाख ३४ हजार ४९८ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात ७ हजार ६४८ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शुन्य रक्कमेवर आधारित महिलांचे खाते उघडण्यात येत आहे. सर्व घटकातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याकरीता प्रशासनासोबत सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे. महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता पुढे यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

यावेळी श्री. पवार यांच्या उपस्थितीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ महिलांचे प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज स्विकारण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बागल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here