बारामतीत “मानवी केसांचा कचरा संकलन व पुनर्वापर उपक्रम” या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ ….
बारामतीत “मानवी केसांचा कचरा संकलन व पुनर्वापर उपक्रम” या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. बारामती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमात नाभिक समाजाला पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक अधिकारी राजेंद्र सोनवणे तसेच बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, उपाध्यक्ष सुदाम कढणे, सचिव किरण कर्वे यांसह नाभिक समाजातील अनेक बांधव उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत नाभिक व्यवसायिकांकडून केसांचा कचरा 10 रुपये प्रति किलो दराने संकलित केला जाईल. विशेषतः, या प्रक्रियेसाठी वाहने आणि ऑनलाइन पेमेंटसाठी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे नाभिक समाजाला उत्पन्नाचा नवीन स्त्रोत उपलब्ध होईल आणि पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडेल. बारामती नगरपरिषदेने हा उपक्रम “स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामती” च्या उद्दिष्टाकडे आणखी एक स्वच्छतेचे पाऊल वाटचाल म्हणून सादर केला आहे.
या उपक्रमाने नाभिक व्यवसायिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि केस कचऱ्याचा पुनर्वापर करून तो उपयुक्त गोष्टींमध्ये रुपांतरित करण्याचा आदर्श निर्माण केला जाईल. बारामतीच्या सर्व नाभिक समाजाच्या व्यावसायिक घटकांनीही या प्रकारच्या संकल्पनांचा अवलंब करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.