पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा चरणसेवा उपक्रम
बारामती, दि.१५: आषाढी वारीत सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीची आस लागत पंढरीकडे चालणारी पाऊले, या वारकऱ्यांच्या थकलेल्या चरणांची सेवा आणि त्या माध्यमातून पुढे चालण्यास मिळणारे बळ…थकलेल्या चरणांची सेवा.. वारकऱ्यांच्या थकवा होतोय दूर… अशा चरणसेवा उपक्रमाला बारामती नगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.
या वर्षीही सेवा केंद्रांवर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा करण्यात येत आहे.
‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित पालखी विसावा ठिकाणी ठिकाणी ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




