मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर महाराष्ट्र राज्यआरोग्याचा’ उपक्रम पुणे जिल्ह्यात यशस्वीरीत्या संपन्न!

0
9

‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर महाराष्ट्र राज्यआरोग्याचा’ उपक्रम पुणे जिल्ह्यात यशस्वीरीत्या संपन्न!

११८ सत्रांतून ११,६३० विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यजागृती; ११,०९७ विद्यार्थ्यांनी घेतली आरोग्यविषयक शपथ

पुणे, दि. २४ ऑक्टोबर २०२६ : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ हा उपक्रम पुणे जिल्ह्यात दिनांक १३ ऑक्टोबर ते २४ दरम्यान यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत, या कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय व आरोग्यविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली.

पुणे जिल्ह्यात ११८ सत्रांचे आयोजन

पुणे जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत एकूण ११८ आरोग्यजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये ११,६३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तर ११,०९७ विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शपथ घेतली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (MUHS) संलग्न महाविद्यालयांच्या माध्यमातून ८१ सत्रे, आयुष महाविद्यालयांच्या माध्यमातून ३३ सत्रे, तर इतर संस्थांच्या माध्यमातून ४ सत्रे आयोजित करण्यात आली.
याशिवाय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनीही या उपक्रमात विशेष सहभाग नोंदवून आरोग्यजागृतीच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशी माहिती डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली.

अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे विशेष योगदान

पुणे जिल्ह्यात अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, पुणे यांनी या उपक्रमांतर्गत सर्वाधिक ११ सत्रांचे आयोजन केले. या सत्रांमध्ये ६९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि ६९३ विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शपथ घेतली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आरोग्यजागृतीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी महाविद्यालयाने दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले.

मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीवर भर

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, व्यसनमुक्त जीवन, आत्महत्या प्रतिबंध, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक व भावनिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक योग्य सवयी विकसित व्हाव्यात, त्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहावे आणि आपल्या कुटुंबात तसेच समाजातही आरोग्यजागृती करावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

श्री रामेश्वर नाईक म्हणाले,
“सुदृढ विद्यार्थी, सक्षम महाराष्ट्र! विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागृती निर्माण करून व्यसनमुक्त, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडविणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणाईच्या आरोग्यातूनच महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडेल. या जनजागृती अभियानात योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

  • श्री. रामेश्वर नाईक,
    कक्ष प्रमुख,
    मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत,महाराष्ट्र राज्य

आरोग्यदायी पिढी घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ हा उपक्रम केवळ आरोग्यविषयक माहिती देण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करणारा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील ११८ सत्रांमधून झालेला व्यापक सहभाग हा आरोग्यजागृतीच्या कार्यातील सकारात्मक टप्पा आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि निरोगी समाजनिर्मितीस हातभार लावणे, या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

“आरोग्यदायी विद्यार्थी, व्यसनमुक्त युवा आणि सक्षम महाराष्ट्र” या ध्येयाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here