बारामतीत ‘बाप समजावून घेताना’ने श्रोते भावूक

0
3

बारामतीत ‘बाप समजावून घेताना’ने श्रोते भावूक
बारामती, ता. २५ : आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव, नात्यांमधील ओलावा आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या वसंत हंकारे यांच्या ‘बाप समजावून घेताना’ या व्याख्यानाने शनिवारी (ता. २४) बारामतीकरांना भावूक केले.

विद्यानगरीतील ग. दि. मा. सभागृहात झालेल्या या व्याख्यानादरम्यान अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पालक आणि तरुणाईला अंतर्मुख करणारा हा कार्यक्रम एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘प्रतिबिंब’ व्याख्यानमालेअंतर्गत आयोजित करण्यात आला होता.


मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारे आई-वडील, त्यांच्या कष्टांची जाणीव आणि मुलांकडून मिळणाऱ्या अपेक्षित प्रेमाचा अभाव यावर हंकारे यांनी प्रभावीपणे भाष्य केले. मोबाईल, सोशल मीडिया, व्यसनाधीनता आणि पालक-मुलांमधील वाढते भावनिक अंतर या विषयी त्यांनी तरुणाईला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.


सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी संस्कारांचे महत्त्व विशद केले. पालकांचा आदर, सामाजिक जबाबदारी आणि व्यसनांपासून दूर राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
बाप आयुष्यभर झिजतो, पण त्याच्या कष्टांची जाणीव किती मुलांना असते. मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारा बाप आणि मुलांच्या भविष्यासाठी आयुष्य वेचणारी आई आणि मुलांच्या यशासाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करणारे पालक यांचे वास्तव हंकारे यांनी आपल्या प्रभावी शैलीत मांडले. मुलांना मोठे करताना आई-वडील किती संकटे सहन करतात, किती इच्छा मनातच दडपतात आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी किती कष्ट उपसतात, याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली.

अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादा पवार यांची आपले व्याख्यान ऐकण्याची इच्छा होती; मात्र तो योग आला नाही. त्यांच्या पश्चात आज हा कार्यक्रम होत असल्याचे सांगत हंकारे यांनी अजितदादांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
नगरसेवक अमोल कावळे यांनी हंकारे यांचा सत्कार केला. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

बारामती- प्रतिबिंब व्याख्यानमालेत बाप समजून घेताना या विषयावर बोलताना प्रा.वसंत हंकारे

Previous articleबारामतीत ‘बाप समजावून घेताना’ने घातला भावनांना हात; गदिमा सभागृह अश्रूंनी ओलावले!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here