सोमेश्वरच्या राजकारणात भूकंप!
पुरुषोत्तम जगताप यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबन; बंडखोरी भोवली!
बारामती :- सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६ : अधिकृत पॅनलविरोधात स्वतंत्र पॅनल उभे केल्याचा आरोप; राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कारवाई
बारामती | प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा आज, शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. पक्षाच्या अधिकृत पॅनलविरोधात स्वतंत्र पॅनल उभे करून बंडखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आज झालेल्या या पत्रकार परिषदेला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल, नगराध्यक्ष सचिन सातव, राजेंद्र कोरेकर आणि पंचायत समितीचे सभापती किरण तावरे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी होळकर आणि संदीप बांदल यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या निलंबनाची अधिकृत घोषणा केली.
अधिकृत पॅनलविरोधात बंडखोरी; पक्षाचा कारवाईचा बडगा!
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुरुषोत्तम जगताप यांच्यासह २१ उमेदवारांचे पॅनल जाहीर करण्यात आले होते. पक्षाच्या नेतृत्वाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारी निश्चित केली होती. मात्र, त्यानंतर जगताप यांनी पक्षाच्या अधिकृत पॅनलविरोधात स्वतंत्र पॅनल उभे केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन स्वतंत्र पॅनल उभे करणे हा पक्षशिस्तीचा भंग असल्याचे सांगत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
अजितदादांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप
स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याशी जिव्हाळ्याचे नाते होते. कारखान्याच्या प्रगतीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आणि कारखान्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
अशा परिस्थितीत पक्षाच्या अधिकृत पॅनलविरोधात स्वतंत्र पॅनल उभे करणे म्हणजे अजितदादांच्या विचारांशी प्रतारणा आणि पक्षनेतृत्वाच्या विश्वासाला तडा देणारी कृती असल्याची टीका पदाधिकाऱ्यांनी केली. सुनेत्रा पवार यांना विश्वासात न घेता स्वतंत्र पॅनल उभे केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
निवडणुकीआधी राजकीय समीकरणांना धक्का!
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०२६ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनल’च्या माध्यमातून लढवली जात आहे. या निवडणुकीत २१ उमेदवार मैदानात उतरवण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
निवडणुकीच्या तोंडावर माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे सोमेश्वरच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. या कारवाईचा निवडणुकीतील समीकरणांवर काय परिणाम होणार आणि सभासद कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर झालेल्या या कारवाईमुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक अधिकच तापली असून, बंडखोरीचा मुद्दा आता निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे.




