माझी विद्यार्थ्यांची चळवळ; पुनर्जीवित झाली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज…!
संतोष शिंदे संपादक भावनगरी बारामती९८२२७३०१०८
“जिथे शासन अपुरे पडले, तिथे विद्यार्थ्यांनी इतिहास घडवला!”
केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा काही वर्षांपासून बंद अवस्थेत होती. एकेकाळी हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी ही शाळा ओस पडलेली पाहून अनेक माजी विद्यार्थ्यांच्या मनाला वेदना होत होत्या. मात्र, १५ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेने या शाळेच्या पुनर्जन्माची नांदी ठरली.

सुमारे बारा शेकड्यांहून अधिक विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजासह भव्य प्रभातफेरी काढत शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या दिवशी केवळ प्रभातफेरी झाली नाही, तर एका सामाजिक चळवळीचा जन्म झाला. काही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली शाळा पुन्हा सुरू करण्याची तळमळ हळूहळू जनआंदोलन बनली आणि आज त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

आज पुनर्जीवित झालेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे, सामाजिक बांधिलकीचे आणि जिद्दीचे प्रतीक बनली आहे. माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि केजकर नागरिक यांच्या अथक प्रयत्नांमुळे शाळेला नवसंजीवनी मिळाली.
सध्या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. वर्गखोल्या, हॉल, बाह्य बांधकाम, प्लास्टर, दरवाजे-खिडक्या, वेल्डिंग आणि रंगकाम यांची कामे सुरू असून अजूनही काही कामे पूर्ण करावयाची आहेत. शाळेसाठी बोअरवेल घेण्यात आली असून दीड इंची पाणी लागले आहे. पाईपलाईनचे काम सुरू आहे तर पाण्याची टाकी बसविणे बाकी आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक व्यवस्था, अतिरिक्त सुविधा आणि इतर आवश्यक खर्चासाठी अजूनही निधीची गरज आहे.

विशेष म्हणजे या सर्व कामासाठी माजी विद्यार्थ्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर स्वतःचा वेळ, श्रम आणि कौशल्यदेखील दिले. निधी संकलनापासून ते बांधकामाच्या देखरेखीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. ही भावना म्हणजे केवळ शाळेवरील प्रेम नसून आपल्या मातृसंस्थेप्रती असलेली कृतज्ञता आहे.

आज केजमधील प्रत्येक नागरिकाला या कार्याचा अभिमान वाटत आहे. कारण ही चळवळ दाखवून देते की, इच्छाशक्ती, एकजूट आणि सामाजिक जबाबदारी यांच्या जोरावर अशक्य वाटणारे कार्यही शक्य होते.
केज तालुका आणि शहरातील सर्व पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज येथे प्रवेश द्यावा. शाळेला पुन्हा एकदा पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
आज परिस्थिती अशी आहे की, “माझी शाळा” या भावनेने प्रेरित झालेले विद्यार्थी आता गप्प बसणार नाहीत. शाळेच्या विकासासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्यासाठी ते सज्ज आहेत. ही केवळ एका शाळेची कथा नाही, तर समाज परिवर्तनाची प्रेरणादायी गाथा आहे.
खरे तर हा प्रश्न प्रशासनालाही विचार करायला लावणारा आहे. जी गोष्ट यंत्रणेला जमली नाही, ती विद्यार्थ्यांनी करून दाखवली. म्हणूनच केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या पुनरुज्जीवनाची ही कहाणी प्रशासनालाही लाजवेल अशी ठरते.
सलाम त्या माजी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि केजकरांना, ज्यांनी “शाळा वाचवा” हा संकल्प कृतीत उतरवून इतिहास घडवला!





