जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा स्वाद; गौरव मगरच्या पराठ्यांची पुण्यात रंगली चर्चा!
संतोष शिंदे भावनगरी संपादक बारामती ९८२२७३०१०८
पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण धडपड करतात, पण आपल्या मेहनतीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे फार कमी असतात. परभणी जिल्ह्यातील होतकरू, गरजू, मेहनती आणि जिद्दी युवक गौरव मगर याने हेच करून दाखवले आहे.

विशेष म्हणजे, गौरवने आपल्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी केली. लहान वयातच कष्टाची सवय आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनाशी बाळगत त्याने कामाला प्रारंभ केला. आज अवघ्या अठरा वर्षांचा असलेला हा तरुण गेल्या चार वर्षांच्या अथक परिश्रमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. आपल्या चवदार आणि दर्जेदार पराठ्यांमुळे त्याने ग्राहकांना अक्षरशः प्रेमात पाडले आहे.
स्वप्न मोठे आणि साधनं मर्यादित असतानाही गौरवने हार मानली नाही. पुण्यातील सेनापती बापट रोडलगतच्या गोखले नगर परिसरात एका छोट्याशा हातगाडीवर त्याने नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र त्याच्या प्रामाणिकपणा, चविष्ट पदार्थ आणि ग्राहकांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे त्याच्या गाडीवर ग्राहकांची गर्दी वाढू लागली.
आज गौरवच्या गाडीवर मिळणारे विविध प्रकारचे पराठे ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. आलू पराठा, मेथी पराठा, गोबी पराठा, चीज पराठा यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक खाद्यप्रेमी आवर्जून येथे भेट देतात. प्रत्येक पराठा ताजा, चवदार आणि दर्जेदार साहित्य वापरून तयार केला जातो. त्यामुळे एकदा चाखलेला स्वाद पुन्हा पुन्हा येथे खेचून आणतो.
गौरवच्या यशामागील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची क्विक सर्व्हिस. “दहा मिनिटांच्या आत ऑर्डर तयार” ही त्याची खास ओळख बनली आहे. ग्राहकांना वाट पाहावी लागू नये यासाठी तो सतत तत्पर असतो. याच सेवाभावामुळे त्याने अल्पावधीतच विश्वासू ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.
स्वतःच्या जिज्ञासूपणा, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उभा राहिलेला गौरव मगर आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. अवघ्या अठरा वर्षांच्या वयात त्याने सिद्ध करून दाखवले आहे की, यशासाठी वय नव्हे तर मेहनत, सातत्य आणि जिद्द महत्त्वाची असते.
मराठवाड्याच्या मातीतून घडलेला हा जिद्दी तरुण आज “मराठवाड्याचा गौरव” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. छोट्याशा गाडीपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता यशाच्या नव्या उंचींकडे झेपावत आहे.
पुण्यातील गोखले नगर परिसरात गेल्यास गौरव मगरच्या गाडीवरील खमंग, लज्जतदार आणि ताज्या पराठ्यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. कारण येथे मिळतो केवळ पराठ्यांचा स्वाद नाही, तर एका जिद्दी, कष्टाळू आणि स्वप्नाळू तरुणाच्या संघर्षाचा, आत्मविश्वासाचा आणि यशाचा सुवासही अनुभवायला मिळतो.





