गावगाड्याचा कलावंत राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्रीने सन्मानित; तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या जीवनगौरवाचा अभिमानास्पद क्षण

0
9

गावगाड्याचा कलावंत राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्रीने सन्मानित; तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या जीवनगौरवाचा अभिमानास्पद क्षण

प्रतिनिधी | नवी दिल्ली
“तमाशा हीच माझी आई… तिच्याच कुशीत माझं आयुष्य फुललं. जन्मानंतर अवघ्या पाचव्या दिवशी तमाशाच्या बोर्डावर आलो आणि आयुष्यभर त्या रंगमंचाशी नाळ जोडली गेली…” या भावूक शब्दांत ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडला आणि उपस्थितांच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटून आले.
लोककलेचा वारसा जपत महाराष्ट्राच्या तमाशा परंपरेला देशपातळीवर वेगळी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अभिमानास्पद सन्मानाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे मराठी बांधवांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. हा क्षण केवळ रघुवीर खेडकर यांच्या आयुष्यातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या लोककला परंपरेसाठी गौरवाचा ठरला.
या विशेष प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, लेखक संतोष खेडलेकर यांनी रघुवीर खेडकर यांची मनमोकळी मुलाखत घेतली. या संवादातून त्यांच्या बालपणापासूनच्या तमाशा प्रवासातील अनेक आठवणी, संघर्ष, जिद्द आणि लोककलेवरील अपार प्रेम श्रोत्यांसमोर जिवंत झालं.
मुलाखतीत बोलताना रघुवीर खेडकर म्हणाले,
“लोक तमाशा पाहायला येतात ते काही क्षण त्यांचं दुःख विसरायला… आम्ही त्यांना हसवतो, गाण्यात-नृत्यात रंगवतो… प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य हाच आमच्या कलेचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.”
फड, गवळण, बतावणी, वगनाट्य, सोंगाड्या आणि लोककलावंतांच्या जगण्यातील संघर्ष, त्याग आणि समर्पण याविषयी त्यांनी अत्यंत प्रांजळपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या बोलण्यातून तमाशा कलेबद्दलची निष्ठा आणि त्या कलेसाठी वाहिलेलं संपूर्ण आयुष्य उपस्थितांना अनुभवायला मिळालं.
यावेळी त्यांनी तमाशा कलेच्या संवर्धनासाठी स्वतंत्र तमाशा महामंडळ स्थापन करण्याची अपेक्षाही व्यक्त केली. “लोककलावंतांना संरक्षण, सन्मान आणि नवं व्यासपीठ मिळालं तर ही कला नव्या पिढीपर्यंत अधिक ताकदीने पोहोचेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्याला निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, निवृत्त नेव्ही ॲडमिरल सतीश घोरमाडे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, ज्येष्ठ पत्रकार अभिजित कांबळे, मयूर अत्रे, प्राची गावंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रघुवीर खेडकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेकांनी लोककलेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार संतोष खेडेकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीमुळे रघुवीर खेडकर यांच्या आयुष्याचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर जिवंत झाला. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सत्कार समारंभ न ठरता महाराष्ट्राच्या लोककलेच्या अस्मितेला मानवंदना देणारा आणि तमाशा परंपरेच्या अभिमानाचा भावस्पर्शी सोहळा ठरला.
राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला पद्मश्री सन्मान हा एका कलाकाराचा गौरव असला तरी तो महाराष्ट्राच्या लोककलेचा, तमाशाच्या परंपरेचा आणि गावगाड्याच्या संस्कृतीचा राष्ट्रीय सन्मान ठरला.

आनंद वाटला आपल्या सारख्या दिग्गज हरहुन्नरी कलाकाराचा मानसन्मान होतो.त्या कलेला ‘ वाव” सन्मान मिळतो त्यावेळेस नक्कीच आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांनाही आपला हेवा नक्कीच वाटतो ग्रेट आमच्या भावनगरी च्या वतीने लाख लाख शुभेच्छा अभिनंदन






        
Previous articleबारामती एमआयडीसीत पाणीटंचाईचे तीव्र संकट; नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ…!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here