“प्रभू उठला आहे !” — पुनरुत्थान प्रेम आणि आशेचा संदेश

0
4

“प्रभू उठला आहे !” — पुनरुत्थान प्रेम आणि आशेचा संदेश

भल्या मोठ्या पहाटे, शहराच्या मुख्य रस्त्यावरून एक वेगळाच जयघोष घुमत होता….., “प्रभू उठला आहे !” हा साद-प्रतिसाद देत आनंदाने घोषणा करणारा जनसमुदाय पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला हा प्रभू कोण? तो खरोखर उठला आहे का? आणि याचा अर्थ तरी काय ?

 इतिहासात मृत्यूनंतर पुन्हा उठल्याची घटना क्वचितच ऐकू येते. पण या घोषणांचा उलगडा पुढील शब्दांत झाला “शांतीदाता येशू ख्रिस्त, मुक्तिदाता येशू ख्रिस्त, राजांचा राजा येशू ख्रिस्त !” दोन हजार वर्षांनंतरही प्रभू येशूची कबर रिकामी आहे, आणि तीच त्यांच्या पुनरुत्थानाची साक्ष देत आहे.

 इस्राईल देशातील येरूशलेम शहरातील Church of the Holy Sepulchre येथे आजही ही कबर अस्तित्वात आहे आणि जगभरातील भाविकांसाठी ती श्रद्धास्थान ठरली आहे. ही रिकामी कबर केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर ती मानवजातीसाठी विजय, प्रेम आणि आशेचा जिवंत संदेश आहे.

१) विजयाचा संदेश

जीवन म्हणजे एक शर्यत आहे. प्रत्येकजण यश, समाधान आणि खऱ्या विजयाच्या शोधात धावत असतो. पण पाप, दुःख आणि आत्मिक संघर्षामुळे हा विजय सहज मिळत नाही. प्रभू येशूंनी मानवजातीवर प्रेम करत क्रुसावर बलिदान दिले आणि मृत्यूवर विजय मिळविला. त्यांच्या पुनरुत्थानामुळे हे सिद्ध झाले की वाईटावर, पापावर आणि मृत्यूवरही विजय मिळविता येतो. हा विजय केवळ त्यांचा नाही, तर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.

२) त्याग आणि प्रेमाचा संदेश

प्रभू येशू ख्रिस्तांनी निस्वार्थ प्रेम आणि सर्वोच्च त्यागाचे उदाहरण घालून दिले. क्रुसावर असह्य वेदना सहन करतानाही त्यांनी प्रार्थना केली. “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही.” हा संदेश केवळ शब्दांत नाही, तर कृतीतून दाखवलेला आहे.

त्यांनी आपल्या शत्रूंवरही प्रेम करण्याची शिकवण दिली आणि पाप्यांनाही क्षमा केली. त्यांच्या सोबत क्रुसावर असलेल्या एका चोराने विश्वास दाखवला, आणि येशूंनी त्याला तारणाचे आश्वासन दिले. यातून स्पष्ट होते की खरे प्रेम म्हणजे स्वार्थ सोडून इतरांसाठी जगणे आणि त्याग करणे.

३) आशेचा आणि नवजीवनाचा संदेश

रिकामी कबर आपल्याला सांगते की मृत्यू हा शेवट नाही. त्यानंतरही एक नवीन, आनंदी आणि पापमुक्त जीवन आहे. प्रभू येशू म्हणतात की “नव्या जन्मावाचून देवाचे राज्य पाहता येणार नाही.” याचा अर्थ केवळ शारीरिक नव्हे, तर आध्यात्मिक परिवर्तन आवश्यक आहे. येशूंच्या पुनरुत्थानामुळे मानवाला पापातून मुक्ती आणि अनंत जीवनाची आशा मिळते. हा संदेश प्रत्येकाला नवे जीवन जगण्याची प्रेरणा देतो पवित्र, प्रेमळ आणि देवाच्या इच्छेनुसार.

संदेश

मित्रांनो, आजही ती रिकामी कबर जणू साक्ष देत आहे “प्रभू उठला आहे !”

हा केवळ एक जयघोष नाही, तर जीवन बदलणारा सत्य संदेश आहे.

चला, आपणही अंतःकरणापासून या घोषणेला प्रतिसाद देऊया “खरोखर प्रभू उठला आहे !” आणि त्याच्या पुनरुत्थानातून मिळणारा विजय, प्रेम आणि आशा आपल्या जीवनात स्विकारूया.

 मि.सुशील राठोड

     माजी सचिव

चर्च ऑफ ख्राईस्ट, बारामती

मो. नं 9923216295 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here