शेतकऱ्यांना आर्थिक मदत, दिवसा वीज अन् सिंचनासाठी पाणी देण्यास शासन कटिबद्ध; खेडच्या १९ गावांना सौर प्रकल्पातून मिळणार दिवसा वीज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
चाकणमध्ये राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेचे उद्घाटन; चक्रेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांचे लोकार्पण, कडूस-पानमंदवाडी येथील ५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन
चाकण : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाचे पाणी, दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख प्राधान्य आहे. शेतकरी टिकला तरच शेती टिकेल आणि शेती टिकली तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल. या भूमिकेतून शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेचे उद्घाटन, श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, कडूस-पानमंदवाडी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन तसेच पोलीस मदत केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, नगराध्यक्ष मनीषा गोरे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण थिगळे, उपाध्यक्ष सचिन मांजरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, समीर सुपे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबत मूलभूत सुविधा देण्यावर भर
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे केवळ आर्थिक मदत देऊन चालणार नाही, तर शेतीला आवश्यक असणारे पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि चारा उपलब्धतेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
१९ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा खात्रीशीर वीज
खेड तालुक्यातील कडूस-पानमंदवाडी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेला पाच मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प परिसरातील सुमारे १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आणि अधिक खात्रीशीर वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि मंजुरीतून हा प्रकल्प साकार झाला असून तो प्रत्यक्ष कार्यान्वित होत असल्याचे समाधान आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होईल. परिणामी बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीविताला असलेला धोका कमी होण्यास मदत होईल. तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी कमी होऊन शेतीच्या कामांचे नियोजन अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न
खेड तालुका औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागाच्या विकासासाठी अजित पवार यांनी नेहमीच विशेष लक्ष दिले. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, यावर त्यांचा भर होता. त्यांनी आखून दिलेल्या विकासाच्या मार्गावरून पुढे जात संपूर्ण खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
चाकण परिसरातील वाढती वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर उन्नत मार्गाचा प्रकल्प मार्गी लावण्यावर शासनाचा भर आहे. तसेच चाकणपर्यंत मेट्रोची जोडणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या विकासालाही प्राधान्य दिले जात आहे.
चाकण हा मोठा औद्योगिक परिसर असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. मात्र, वाढत्या औद्योगिकीकरणाच्या तुलनेत वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. चाकणकरांच्या अपेक्षा पूर्ण करून परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० शाखांचे जाळे
सहकार ही महाराष्ट्राची मोठी ताकद असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात सहकारी संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून राजगुरुनगर सहकारी बँकेने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. बँक शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असून सध्या बँकेच्या २० शाखांचे जाळे उभे राहिले आहे, असे गौरवोद्गार सुनेत्रा पवार यांनी काढले.
बँकेकडे सुमारे २ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी असून १ हजार २५० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने सुमारे २७ कोटी रुपयांचा नफा मिळवला असून नेट एनपीए शून्य टक्के आहे. बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. बँकेने डिजिटल बँकिंग अधिक सक्षम करावे आणि ग्रामीण भागातील उद्योजक, महिला तसेच तरुणांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
चक्रेश्वर मंदिर परिसराचा कायापालट; विविध विकासकामांचे लोकार्पण
चाकण येथील श्री चक्रेश्वर मंदिर परिसरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. यामध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण, संरक्षक भिंत, स्ट्रीटलाईट आणि नऊ मीटर उंचीचे हायमास्ट दिवे अशा कामांचा समावेश आहे.
साळुंके वस्ती ते चक्रेश्वर मंदिर रस्त्याचे काँक्रीटीकरण, मंदिर परिसरातील संरक्षक भिंत तसेच मंदिर रस्त्यापासून कमानीपर्यंत काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. या सुविधांमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंजवडी मेट्रोसह रस्ते विकासाला गती
हिंजवडी-माण ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका सुरू झाल्यामुळे हिंजवडी आयटी क्षेत्रासह परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
या स्पर्धेच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध रस्त्यांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम सुरू आहे. याचा लाभ खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांनाही होणार असून दळणवळण, पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन
अजित पवार यांनी पाहिलेले विकसित, सक्षम आणि आधुनिक खेड तालुक्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विकासकामांना मंजुरी मिळणे महत्त्वाचे असले तरी ती कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने एकत्रित काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
यावेळी आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




