बारामती तालुक्यात खांडज गावचे भारनियमन बंद; घरोघरी पसरला लोकसहभागाचा प्रकाश
युगेंद्र पवार यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश
बारामती : शासकीय पातळीवर नुसत्याच मागण्या आणि आंदोलने करण्यापेक्षा एखाद्या विषयाच्या मुळाशी जात नागरिकांना विश्वासात घेऊन उत्तम पर्याय सुचवले आणि एक चांगला लोककल्याण मार्ग सर्वांना दाखवून दिला, तर कोणतीही समस्यां चुटकीसरशी सुटू शकते, याचा वस्तुपाठ युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यात घालून दिला आहे. तालुक्यातील खांडज गावात त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून त्यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून गावकऱ्यांना आता विनाभरनियमन अखंड वीजपुरवठा सुरू झाला आहे.
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लागू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी मोक्याच्या वेळीच म्हणजे सायंकाळी वीज खंडित होत असल्याने जनावरांची देखभाल करणे, दूध काढणे, स्वयंपाक, घरकाम तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अनंत अडचणी येत आहेत. या समस्येची दखल घेत युगेंद्र पवार यांनी महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत महावितरणकडून काही उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. सायंकाळच्या वेळी कृषीपंप, कडबा कुट्टी यंत्रे, ग्राउंडिंग मशीन आदि यंत्रे, की ज्यांना वीज जास्त लागते, ती न वापरता केवळ घरगुती कारणांसाठीच विजेचा केल्यास सायंकाळचा वीज पुरवठा कायम ठेवता येऊ शकतो, असे उपाय सुचविण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले, तर ही बाब सहज शक्य आहे, ही गोष्ट लक्षात येताच युगेंद्र पवार आणि त्यांचे कार्यकर्ते लागलीच कामाला लागले. त्यानंतर त्यांनी खंडाज गावात जनजागृती राबवली.
ही जबाबदारी स्वीकारत त्यांनी खांडज गावात जनजागृती मोहीम राबवली. घरोघरी जाऊन नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले. आपण स्वतः काही गोष्टी कटाक्षाने केल्या, तर गावाची एक मोठी समस्या दूर होऊ शकते, हे त्यांनी घराघरात जाऊन पटवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सक्रिय पुढाकार घेऊन मोठ्या हिरीरीने काम केले. याकामी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले. तसेच प्रत्यक्ष ग्रामसभेत याबाबत ठराव मंजूर करून तो महावितरणकडे सादर करण्यात आला.
या ठरावाची दखल घेत महावितरणने तातडीने कार्यवाही केली असून काल (दि. ३१) खांडज येथे सायंकाळचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून गावात समाधानाचे वातावरण आहे. गावातील महिला, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या उपाययोजनांचा मोठा लाभ झाला आहे. भारनियमन बंद होऊन गावचा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी खांडज ग्रामस्थांना सहकार्यासाठी धन्यवाद देत महावितरणचेही आभार मानले आहेत.
खांडजचा हा आदर्श बारामती तालुक्यातील इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. प्रत्येक गावाने असा ठराव करून महावितरणसोबत समन्वय साधल्यास भरनियमनाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे सांगत युगेंद्र पवार यांनी तालुक्यातील सर्वच गावच्या ग्रामस्थांना आपापल्या गावात अशा प्रकारे जनजागृती करून असा ठराव घ्यावा, असे आवाहन केले आहे. याकामी आम्ही सर्वजण महावितरणसोबत समन्वय साधून पूर्ण सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत ग्वाही युगेंद्र पवार यांनी दिली.





