निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड; कबीरभाई तांबोळी कार्यकारिणी सदस्य ..!

0
4

निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड; कबीरभाई तांबोळी कार्यकारिणी सदस्य

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवार समितीची नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक; देशभरातील परिवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा निर्धार

नवी दिल्ली, दि. २० सप्टेंबर २०२६ : स्वातंत्र्यलढ्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या उत्तराधिकारी परिवारांच्या हक्क, सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा आणि विविध सुविधांसाठी देशव्यापी संघटन उभारण्याचा निर्धार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवार समिती (रजि.), गैर-राजनैतिक संगठन यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून मान्यता देऊन त्यांच्या सन्मान, अधिकार व सुविधांसाठी देशभर समान धोरण असावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रेस क्लब ऑफ इंडिया, रायसीना रोड, नवी दिल्ली येथे समितीची अर्धवार्षिक राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. देशातील २१ राज्यांमधून ४२ राष्ट्रीय व प्रादेशिक प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी, कार्यकारी महासचिव चंद्रप्रकाश वाजपेई (माजी आमदार), राष्ट्रीय संघटन सचिव कपूर सिंह दलाल यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प
बैठकीत राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी यांनी संघटनेच्या आगामी कार्याचा आढावा घेतला. देशभरातील स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. देशातील सुमारे पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी व्यापक जनसंपर्क, जनजागृती आणि संघटन विस्ताराचे अभियान राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सध्या समितीचे कार्य २३ राज्यांमध्ये सुरू असून स्वातंत्र्यसैनिक परिवारांच्या सन्मान, अधिकार व हितासाठी तसेच विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांसाठी संघटना कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
राज्यनिहाय सुविधांचा आढावा
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा यांनी विविध राज्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना मिळणाऱ्या सुविधा, सन्मान आणि शासकीय तरतुदींचा आढावा घेतला. पंजाब, उत्तराखंड, आसाम आणि छत्तीसगड या राज्यांतील विविध अधिसूचना व तरतुदींवर विशेष चर्चा करण्यात आली.
देशातील सर्व राज्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना समान सन्मान, सुविधा व अधिकार मिळावेत, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे संघटितपणे पाठपुरावा करण्याची कार्ययोजना बैठकीत निश्चित करण्यात आली.
युवा व मातृशक्तीला संघटनेत मोठी जबाबदारी
स्वातंत्र्यसैनिक परिवारातील पहिल्या पिढीचे वाढते वय लक्षात घेता संघटनेच्या पुढील वाटचालीत युवा शक्ती आणि मातृशक्तीला अधिक सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला. मातृशक्ती मंच आणि युवा मंच अधिक सक्षम करून नव्या पिढीला संघटनेच्या कार्याशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गोपालदास गुजराती यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम सुरू असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या अभियानाशी जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड
संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली.
महात्मा गांधींचे विचार आणि स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी निलेशभाई कोठारी यांनी गावोगावी जाऊन जनजागृती केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाचा इतिहास समाजासमोर मांडण्याबरोबरच संघटनेच्या विस्तारासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल बैठकीत त्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच कबीरभाई तांबोळी यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याला यामुळे अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांसाठी विविध मागण्या
नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेशभाई कोठारी यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. इतर राज्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना काही सुविधा व सवलती उपलब्ध असताना महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित सन्मान व सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. त्यामध्ये—
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारातील व्यक्तींना ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून घोषित करावे.
उत्तराधिकारी परिवारांसाठी मानधनाची सुविधा सुरू करावी.
एसटी महामंडळ व रेल्वेमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना ५ एकर शेतीची जमीन तसेच निवासासाठी ५ गुंठे जागा किंवा फ्लॅट उपलब्ध करून द्यावा.
उत्तराधिकारी परिवारांच्या राहत्या घरावरील घरपट्टी, पाणीपट्टी व इतर स्थानिक करांमध्ये सवलत किंवा माफी द्यावी.
परिवारातील सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात यावीत.
शेती, उद्योग, व्यापार व व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी ‘स्वातंत्र्यसैनिक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे.
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारातील सदस्यांना औषधोपचारासह मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी.
वसतिगृहांमध्ये उत्तराधिकारी परिवारातील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात याव्यात.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध शासकीय सेवांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी पाठपुरावा
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनासोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन उत्तराधिकारी परिवारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची जबाबदारी निलेशभाई कोठारी यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पदाधिकाऱ्यांचा गौरव व नियुक्तीपत्रांचे वितरण
बैठकीदरम्यान संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गोपालदास गुजराती यांना नियुक्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच विविध राज्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्रे देण्यात आली.
आसाम युनिटच्या वतीने पारंपरिक ‘पटका’ परिधान करून पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेच्या कार्याचा विस्तार आणि पुढील काळातील उपक्रमांबाबतही सविस्तर चर्चा झाली.
स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, राष्ट्रप्रेम, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस मृगांक शेखर आनंद, चंद्रप्रकाश वाजपेई, सुबेदार विजेंद्र सिंह, ए. वेद रत्नम, ओमप्रकाश मांझी, कमलचंद्र लहकर, मोनोतोष दास, माल रेड्डी राजशेखर, कपूर सिंह दलाल, अनुराग सिंह गौतम, आदित्य कुमार गहलोत, राजेश प्रताप सिंह, परमजीत सिंह टीवाना, सुषमा शर्मा, निलेशभाई कोठारी, कबीर तांबोळी, डॉ. अमरनाथ, दिव्याकांत झा, डॉ. उषा किरण वाजपेई, दीपा दास, आदित्य प्रताप सिंह रघुवंशी यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. येत्या २६ ऑक्टोबर रोजी अमरकंटक येथे होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक संमेलनास देशभरातील स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Previous articleबालगोपाळांच्या धमाल स्पर्धांनी रंगला सहकारनगरचा सार्वजनिक गणेश मंडळाचा गणेशोत्सव!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here