नद्यांना ‘अमृत वाहिनी’ केलेच पाहिजे !
नदियाँ ही जीवन की रेखा हैं,
क्या तुमने गौर से नही देखा है?
निसर्गातील सर्वांनाच पाण्याची गरज आहे. नद्या या प्रत्येक भागात पाणी नेऊन पोहचविण्याचे कार्य करतात आणि माणसांव्यतिरिक्त पशू, पक्षी तसेच जंगल, जमीन यांच्या पाण्याची गरज पूर्ण करतात.
नद्या आपल्या जीवनचक्रातील अविभाज्य घटक आहेत. तेव्हा नदीतील अतिमक्रमण, प्रदूषण रोखून नद्यांना अमृत वाहिनी केले पाहिजे, असे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांनी २३ जून रोजी गडचिरोली येथे व्यक्त केलेले मत काळानुरुप योग्य असे आहे.
आजच्या काळात शुध्द पाण्याची आवश्यकता आणि उपलब्ध पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेता पाणी विकत घेणे सर्वांनाच शक्य नाही तेव्हा नद्यांचे आरोग्य सुधारणे तसेच नद्यांमधील अतिक्रमण व प्रदूषण रोखले पाहिजे आणि हे कार्य सरकार, प्रशासन व नागरिकांनी एकत्र येऊन केले पाहिजे, असा त्यांचा आशावाद सर्व घटकांनी विचारात घेण्यासारखा आहे.
डॉ.राजेंद्र सिंह हे जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून मॅगसेस पुरस्कार विजेते आहेत. त्यांचा हा अभ्यास निसर्ग, मानव आणि समाजहिताचा आहे, पण हा विषय कोण किती गांभिर्याने घेतो, हे महत्वाचे आहे.
महाराष्ट्र राज्यात नद्यांची अवस्था फारशी चांगली नाही. अनेक नद्यांचे नाले व नाल्यांचे नाली झालेली असून त्यांचा श्वास कोंडला गेला आहे. नद्यांमधील अतिक्रमण आणि प्रदूषण ही भीषण समस्या बनली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने ‘चला जाणूया नदीला,’ हा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला. या उपक्रमाने हा विषय ऐरणीवर आला आणि नद्यांची सत्य परिस्थिती समोर आली.
अनेक नद्या ज्या बारामाही वाहत होत्या त्या वाहत नाहीत, काही नद्यांवर लहान-मध्यम बंधारे, धरणे बांधल्या गेल्याने त्यांची पूर रेषा बदलली, अवैध रेती वाल्यांनी अनेक नद्यांची चाळणी केली, आजूबाजू राहणार्यांनी नदी पात्रात व पूर रेषेच्या आत अतिक्रमणे केलीत, अनेक वर्षांपासून स्वच्छता व खोलीकरण केले नाही, उलट रसायनयुक्त, प्रदूषीत घाण सांडपाणी नदीत सोडून प्रचंड प्रदूषण केले, वाळू (रेती) खरडून नेली, एकूणच अनेक नद्या भकास केल्या ही वस्तूस्थिती आहे.
‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमातून हे विदारक सत्य समोर आले आहे.
वास्तविक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमात नदी संवाद यात्रा झाली. या अभियानाच्या एकूण ११ उद्दिष्ट मध्ये अनुक्रमे नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे, अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे,नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार-प्रसार याबाबत नियोजन करणे, नदी खोलीकरणाचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याबाबतची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे, अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करणे, आणि नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे, आदी उद्दिष्ट आहेत.
‘चला जाणूया नदीला’ हे अभियान महाराष्ट्र राज्यात राबविणेसाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीही गठीत केली आहे. तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समितीही गठीत आहे.
महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोर्यातील एकूण ७५ नद्यांचे संर्वधन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र सरकारचे उपक्रम प्रत्यक्षात किती जमीनीवर उतरतात? त्यामुळे या उपक्रमातून फार मोठे भले झाल्याचे समोर आले नाही.
एकूणच नदीचे महत्व जाणून घेऊन नदीचे आरोग्य राखणे, नदी स्वच्छ व संरक्षित ठेवणे, यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभाग महत्वाचा ठरतो, तेव्हा तसे प्रामाणिक प्रयत्न करणे काळाची गरज आहे, एवढे मात्र खरे !
शेवटी भारतीय संस्कृतीत वाहत्या नदीला नेहमी पवित्र मानल्या गेले असून मैय्या, माताचा दर्जा दिल्या गेला आहे. जीवनदायीनी असलेल्या नद्या खर्या अर्थाने ‘अमृत वाहिनी’ करण्याचा प्रयत्न व्हावा, या आशयाचा एक शेर आठवतो...
जख्म सुखा और धरा को हरा होना चाहिए,
पानी आँखों से नहीं, नदियों में बहना चाहिए….
राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gamil.com
खामगाव, जि. बुलडाणा.
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)