कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा गौरव; अरविंद जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान
बारामती, प्रतिनिधी : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद संपतराव जगताप यांच्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनिमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवारी नवीन रेशीम मार्केट इमारत, मुख्य यार्ड येथे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी केरवे, फळे-भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष सय्यद बागवान, बाजार समितीचे सभापती विनायक गावडे, उपसभापती अरुण सकट, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, नगरसेवक सुरेश सातव यांच्यासह बाजार समितीचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक, व्यापारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक सुनील पवार यांनी केले. श्री. भोसले यांनी अरविंद जगताप यांच्या कार्याचा प्रेरणादायी लघुचित्रफीत सादर केली, तर सूर्यकांत मोरे यांनी त्यांच्या सेवाकाळाचा आढावा घेतला.

मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी अरविंद जगताप यांच्या प्रामाणिक, पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रशासनाचे कौतुक केले. बाजार समितीच्या विकासासाठी पेट्रोल पंपासाठी जागा उपलब्ध करून देणे, सीएनजी पंप उभारणी, बारामती-सुपे झारगडवाडी येथे नवीन जागा संपादन, बाजार समितीचा विस्तार, आधुनिक सुविधा उभारणी, रयत भवन येथे मॉल उभारणी, गाळे बांधून भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे आदी विकासकामांत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करण्यात आले.

मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पवार कुटुंबीयांच्या सहकार्याने अरविंद जगताप यांनी बाजार समितीला नवे वैभव प्राप्त करून दिले. आज बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची देशातील आदर्श बाजार समिती म्हणून झालेली ओळख ही त्यांच्या कार्याची पावती असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात संभाजीनाना होळकर यांनी अरविंद जगताप यांच्या कार्याचा गौरव करताना, विविध विकासकामांसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. पवार कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अरविंद जगताप यांचा सत्कार करण्यात आला. उपसभापती अरुण सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले





