स्वामी नामाच्या जयघोषाने दुमदुमला ग्रीन पार्क परिसर…!’स्वामी तुझ्या नामाचा मज लागो छंद…’; गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा अद्वितीय संगम

0
4

स्वामी नामाच्या जयघोषाने दुमदुमला ग्रीन पार्क!
‘स्वामी तुझ्या नामाचा मज लागो छंद…’; गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा अद्वितीय संगम
बारामती (प्रतिनिधी): गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान परिसरातील रुई येथील ग्रीन पार्कमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. “स्वामी तुझ्या नामाचा मज लागो छंद… तुझ्या चरणीच लाभो आनंद!” या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.


श्री स्वामी समर्थांच्या पालखीची भव्य मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. पालखी मार्गावर भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि स्वामींच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः दुमदुमून गेले. महिलांनी पालखीला खांदा देत फुगड्या खेळल्या, तर टाळकरी मंडळींनी “अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ!” या जयघोषाने भक्तिभाव जागवला.
सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि संतपरंपरेतील वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकलाकारांचे सादरीकरण. भगवान श्री शिवशंकर, श्री गणेश, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतमाता आणि तिरंगा ध्वजाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील बालकलाकारांनी दिलेली जोशपूर्ण शिवगर्जना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणारी ठरली.
यावेळी शर्वरी हिने गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. संत मुक्ताबाईंच्या वेशात सहभागी झालेल्या चिमुकलीने मुक्ताबाईंचा अभंग सादर करून उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय सादरीकरणांमुळे संपूर्ण सोहळ्याची रंगत अधिक खुलली.
पांढरे शुभ्र पोशाख, भगवे ध्वज, पारंपरिक नृत्य, फुगड्या आणि नातेपुते येथील बँजो पथकाच्या सुरेल वादनामुळे संपूर्ण ग्रीन पार्क भक्ती आणि उत्साहाने भारावून गेले. स्वामी समर्थांचे नामस्मरण, भजने, भारुडे आणि भक्तिगीतांवर भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तीचा आनंद लुटला.

ग्रीन पार्क परिसरातून प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी पुन्हा मंदिरस्थळी दाखल झाली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा अखंड जप, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. नगरसेविका सौ. संपदा चौधर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यात ग्रीन पार्कमधील नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध आकर्षक वेशभूषेतील बालकलाकारांनी पालखी सोहळ्याला आगळेवेगळे आणि देखणे रूप दिले.
विशेष म्हणजे, गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रीन पार्कमधील रहिवाशांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यंदाचे हे पालखी सोहळ्याचे दुसरे वर्ष असून, दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात हा सोहळा साजरा करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. यानिमित्त मंदिरापासून प्रदक्षिणा मार्गापर्यंत आकर्षक रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला होता.

बारामती परिसरातील विविध भागांतून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत नामस्मरणाचा आनंद लुटला. “स्वामी तुझ्या नामाचा मज लागो छंद… तुझ्या चरणीच लाभो आनंद!” या भावनेने भारावलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनात हा दिव्य सोहळा कायमस्वरूपी कोरला गेला. अनेक स्वयंसेवक, महिला मंडळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय
वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.

Previous articleऋतूश्रद्धा अपार्टमेंट येथे दत्त जयंती उत्साहात साजरी..!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here