शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या विचारांचे मंथन – नितीन कुमार शेंडे
मळद (ता. बारामती) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. “हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे आहोत,” हा त्यांचा विशाल विचार आज घराघरात पोहोचला पाहिजे, असे मत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे यांनी व्यक्त केले.

शिवजयंतीनिमित्त मळद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुरज शेठ सातव, बारामती दूध संघाचे संचालक शहाजी काका गावडे, जेष्ठ नेते रामचंद्र नाना मदने, तुकाराम गावडे, लालासाहेब गावडे, अमोल पवार, विकास चव्हाण, माजी सरपंच धनंजय गवारे, नाना जाधव, तसेच गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, राजे उमाजी नाईक, अण्णा भाऊ साठे आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांवर प्रेरणादायी भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन मनोज शिंदे व मित्र परिवाराने केले होते. या वेळी मळद गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्साहात साजरी केली.
