शारदानगर शैक्षणिक संकुलामध्ये उत्साहात साजरा होणार महिला दिन
शारदानगर,दिनांक- २६ :
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे….
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे, समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे, गृह उद्योग चालवणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि शारदा महिला संघाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षे जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून यावर्षीही शारदाबाई पवार शैक्षणिक संकुलामध्ये सामाजिक क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्या कार्यास प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्याचा गौरव तथा सन्मान व्हावा, या हेतूने संस्थेच्या वतीने दिनांक ०६ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात हा शारदा सन्मान सोहळा करण्याचे आयोजिले आहे.यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी महिलांचा संस्थेच्या वतीने ‘शारदा’ सन्मान पत्र देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे.
तरी परिसरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनंदा पवार यांनी केले आहे.
