गर्दीच्या ठिकाणची अतिक्रमणे हटवून वाहतुक नियंत्रणासाठी ‘नायलॉन दोरीचा’ प्रयोग
पूनावाला गार्डन परिसराचा श्वास झाला मोकळा; बारामती वाहतूक पोलिसांची नगरपालिकेच्या मदतीने कारवाई
बारामती दि.११
शहरात गर्दीने गजबजलेल्या रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी आणि बारामतीकरांना मार्ग मोकळा करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनेक मुख्य रस्त्यांवर आणि गर्दीच्या ठिकाणांवरची अतिक्रमणे मागे सारत वाहतूक नियंत्रणासाठी 'नायलॉन दोरीचा' प्रयोग राबवत बारामतीकरांनाच नव्हे तर या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे.
आता पुन्हा एकदा बारामती शहरातील प्रसिद्ध असलेल्या पूनावाला बाग गार्डनसमोरील अतिक्रमणे मागे सरकावत त्या ठिकाणी असलेल्या अस्ताव्यस्त वाहतुकीला नियंत्रणात आणले आहे.पूनावाला गार्डन परिसराच्या रस्त्यावर मोठी गर्दी असते त्यामुळे असंख्य अस्ताव्यस्त वाहनांनी हा रस्ता अक्षरशः ठप्प होतो.यावर आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसल्याने हा प्रश्न कायम भेडसावत होता. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी देखील होत्या. या गार्डन परिसरात मुला-मुलींची आणि महिलांची मोठी वर्दळ असते. त्यांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांवरील वाहतूक नियंत्रणात आणत आता पूनावाला गार्डन येथील वाहतुकीचा प्रश्न हाती घेत पोलीस निरीक्षक यादव यांनी ही कारवाई केली आहे.दि. ११ रोजी सकाळीच १० ते दुपारी २ या कालावधीत पोलीस निरीक्षक यादव यांनी नगरपालिकेला मदतीला बरोबर घेत ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली. ही मोहिम राबवताना यादव यांनी सर्व दुकान धारकांना कारवाईबाबत माहिती दिली. त्यांना लोकांना होत असलेल्या अडचणींबाबत समजावून सांगितले. या रस्त्यावर असलेली अतिक्रमित सर्व दुकाने मागे घेतली. वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्यावर लावू नयेत यासाठी नगरपालिका व वाहतुक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे अंतर ठरवून नायलॉन दोरी ठोकण्यात आली.ही दोरी म्हणजे वाहतुकीची 'लक्ष्मण रेषाच' आहे.जी वाहने या दोरीला बाहेर जातील त्या वाहणावर दांडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुरुवातीच्या आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत याबाबत नागरिकांची वाहतुक नियमांबाबत व दोरीच्या नियमाबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.या कारवाईमुळे वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड बारामती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव वाहतूक अंमलदार अशोक झगडे, प्रशांत चव्हाण, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, योगेश कांबळे, अजिंक्य कदम, स्वाती काजळे, सीमा साबळे, सविता धुमाळ, शीघ्र कृती दलाचे १४ जवान आणि बारामती नगर परिषद कडील अतिक्रमण विभागाचे अनिल सरोदे, किरण साळवे, ज्योतु खरात, सागर गायकवाड, संदिप किरवे, सागर भौसले यांनी केली.
“बारामती शहरातील अनेक मुख्य ठिकाणी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. पूनावाला गार्डनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि मुली महिलांना ये-जा करण्यासाठी आता कोणतीही अडचण येणार नाही. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. वाहतुकीच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची अडचण असल्यास ७७७७९२४६०३ या क्रमांकावर संपर्क करावा.”
~ चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक बारामती वाहतूक शाखा.