राज्यात १६६० नवीन पेट्रोल पंपांसाठी परवानगी; रोजगार निर्मितीला चालना
मुंबई : राज्यातील १६६० नवीन पेट्रोल पंपांना परवानगी देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
रोजगार निर्मितीला मोठी संधी
या निर्णयामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. एका अहवालानुसार, या नवीन पेट्रोल पंपांमुळे सुमारे ३० हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
परवानगी प्रक्रियेला गती
राज्यातील पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण व्हावी, यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. याकरिता परवानगी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे दूर करून अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी-शर्ती ठेवण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाने तयार करावी, असे निर्देशही महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.
‘एक खिडकी’ प्रणालीचा लाभ
सध्याच्या पारंपरिक परवानगी प्रक्रियेमध्ये अनेक स्तरांवर परवानग्या घ्याव्या लागतात, त्यामुळे मोठा विलंब होतो. ‘एक खिडकी योजना’मुळे सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील, यामुळे गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तत्काळ अंमलबजावणीचे आदेश
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्तांना तातडीने सूचना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पेट्रोल पंप मालकांना परवानगीसाठी अनावश्यक वाट पाहावी लागणार नाही.
राज्यातील इंधन व्यवसायाला चालना देण्यासोबतच, नव्या रोजगार निर्मितीला गती देणारा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
