बुलेटच्या कर्कश ‘फटाका’ सायलेंसरला आता वाहतूक पोलिसांचा ‘फटका’
वाहतूक शाखा आक्रमक; जप्ती मोहिमेत १३ सायलेंसर जप्त
बारामती, दि. २५:
बारामती शहरात शिस्तबद्ध आणि शांततामय वाहतूक राखण्यासाठी वाहतूक शाखेने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींच्या मालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन दिवसांत तब्बल १३ गाड्यांचे फटाका सायलेंसर काढून जप्त करण्यात आले असून, संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहरात वाढता कर्कश आवाज आणि नागरिकांचा त्रास
बारामती हे हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, काही बेशिस्त वाहनचालकांच्या कृतीमुळे शहरातील शांततेला बाधा पोहोचत आहे. विशेषतः बुलेट दुचाकीस्वार आपली वाहने मॉडिफाय करून मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसवत आहेत. यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठा आवाज होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आजारी रुग्ण यांना या कर्कश आवाजाचा विशेष फटका बसतो.

वाहतूक पोलिसांनी यापूर्वी अनेकदा सूचना देऊन आणि दंडात्मक कारवाई करूनदेखील काही बेशिस्त तरुण हे नियम मोडत आहेत. त्यामुळेच आता पोलिसांनी थेट अशा गाड्यांचे सायलेंसर जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नाकाबंदी आणि थेट कारवाई
शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून पोलिसांनी अशा वाहनांची तपासणी सुरू केली आहे. वाहनचालक जर फटाका सायलेंसर लावून फिरताना सापडले, तर त्यांचे सायलेंसर जागेवरच काढून घेतले जात आहेत. काही गाड्या थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेल्या जात असून, मूळ सायलेंसर परत बसविल्याशिवाय त्या गाड्या परत दिल्या जात नाहीत.
पोलीस प्रशासनाची ठाम भूमिका

या मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने विशेष योगदान दिले आहे. या मोहिमेत पोलीस जवान सुधाकर जाधव, अजिंक्य कदम, सुभाष काळे, अशोक झगडे, रेश्मा काळे, प्रदीप काळे, स्वाती काजळे, योगेश कातवारे आणि जलद कृती दलाचे जवान अशोक मोरे, शिवाजी बरकडे, योगेश पळसे, अजय आहेर, हैदर जमादार, सुदर्शन कदम, सुभाष डोंबाळे, प्रिया पावडे, प्रियांका पोफळे, श्रद्धा थोरात आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मोहिम आणखी तीव्र होणार!

वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की ही मोहीम येत्या काही दिवसांत आणखी तीव्र केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियमभंग केल्यास करा तक्रार!
कोणत्याही बुलेट वाहनावर फटाका सायलेंसर लावून जर कोणी शहरात धिंगाणा घालत असेल, तर नागरिकांनी +91 9923630652 या क्रमांकावर संपर्क साधून गाडीचा नंबर कळवावा. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
“वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सहकार्य करावे आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योगदान द्यावे.”
- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती वाहतूक शाखा.
ही मोहीम केवळ कारवाईसाठी नसून, नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित व शांततामय बारामतीसाठी हातभार लावावा.
