बारामती शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन
यात्रेचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन
बारामती, दि. ८: केंद्र शासनाच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा आगार व्यवस्थापक वृषाली तांबे यांच्या हस्ते बारामती बस स्थानक येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी पाचशेपेक्षा अधिक नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, नगर अभियंता संजय सोनवणे, कर विभाग प्रमुख महेश आगवणे, गणेश सोनवणे, संतोष जगताप आदी उपस्थित होते.
या यात्रेच्या माध्यमातून नगरपरिषद हद्दीत केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची आकर्षक एलडी चित्ररथाद्वारे प्रसिद्धी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले. नागरिकांना योजनांची माहिती असलेल्या पुस्तिका, घडीपत्रिकेचे वाटपही करण्यात येत आहे. गावातच योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्यामुळे यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
यात्रेदरम्यान पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री आयुष्मान योजना कार्ड, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, मुद्रा कर्ज योजना, स्वच्छ भारत अभियान अशा विविध योजनेची माहिती देण्यात येत आहे. आधार कार्ड विषयक सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आरोग्य शिबाराचे आयोजन करुन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
ही यात्रा ९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता तीन हत्ती चौक, दुपारी ४ वाजता श्री गणेश मार्केट, भाजी मंडई आणि १० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सिटी इन चौक येथे येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
0000