बारामतीचे जळोची उपबाजार मार्केट मध्ये डाळींबास २००/- रूपये प्रति किलो दर
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील फळे व भाजी मार्केट मध्ये डाळींबाची २०० क्रेटची आवक होऊन प्रति किलोस रू. २००/- असा उच्चांकी दर मिळाला तर प्रति क्रेटस् १८०० ते ४००० रूपये दर मिळाला. डाळींबास प्रति किलोस किमाल दर रू. ९०/- व सरासरी दर रू. १५०/-प्रति किलो दर निघाले. संजय गदादे यांचे आडतीवर पणदरे येथील डाळींब उत्पादक शेतकरी माधवराव कोकरे यांचे डाळींबास २०० रूपये प्रति किलो दर मिळाला. बाजार आवारात भारत वारभुवन, अक्षय चव्हाण, कमलेश शिंदे, एकता फ्रुट हे आडतदार असुन जळोची मार्केट मध्ये बारामतीसह इंदापुर, दौंड, फलटण, कर्जत, श्रीगोंदा या तालुक्यातु आवक होत आहे. आठवड्यातुन साधारण ९०० ते १००० क्रेटस् ची डाळींब आवक होत आहे. डाळींब खरेदीसाठी बारामती तालुक्यासह बिहार, कानपुर व दिल्ली येथील खरेदीदार येत असुन सदर डाळींब किरकोळ विक्रीसाठी तसेच बिहार, कानपुर, दिल्ली या ठिकाणी पाठविले जात आहे. त्यामुळे मागणी वाढत असल्याने शेतक-यांना डाळींबास चांगला दर मिळत आहेत अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
डाळींब उत्पादक शेतक-यांनी आपला माल ग्रेडींग व सॉर्टींग करून आणावा म्हणजे आणखी जादा दर मिळेल. स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी आणि बाहेरील राज्यात मागणी असल्याने आणखी दर वाढतील असे अपेक्षित आहे. समितीने जळोची मार्केट मध्ये उभारलेले फळे व भाजीपाला खरेदी विक्री करिता सेलहॉल तसेच शेतक-यांना पुरविलेल्या विविध सुविधा यामुळे शेतक-यांची व व्यापारी वर्गाची सोय झालेली आहे. या सुविधेचा उपयोग बाजार घटकांना होत आहे. समितीने बाहेरील डाळींब व्यापा-यांशी संपर्क साधला असुन लवकरच खरेदीदार वाढतील. याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतक-यांनी आपला माल बारामती बाजार समितीचे आवारात विक्रीस आणावा असे आवाहन समितीचे सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.