छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करा-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
बारामती, दि.२६: छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अनुषंगाने प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयांनी कामे करावीत, असे निर्देश उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिले. ही स्पर्धा १५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत रेल्वे मैदान, बारामती येथे होणार आहे.
श्री. नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय भवन येथे स्पर्धा उपसमिती सदस्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव नीलप्रसाद चव्हाण, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रामसेवक मुखेकर, सुभाष पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता प्रदीप जगताप, वाहन निरीक्षक बजरंग कोरोवले, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सदस्य सतपाल गावडे, कबड्डी खेळाडू दादासाहेब आव्हाड आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, स्पर्धेकरीता उपसमिती नेमण्यात आली असून विषयनिहाय देण्यात आलेल्या जबाबदारीनिहाय प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी. या स्पर्धेत पुरुष व महिला प्रत्येकी १६ संघ दाखल होणार आहे. त्यामुळे रेल्वे मैदान परिसरासह शहरात वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत सुटसुटीत वाहतूक आराखडा तयार करावा. शहरात वाहतुकीच्या अनुषंगाने दिशादर्शक फलक लावावेत. वाहनतळाकरीता जागा निश्चित कराव्यात. बाहेरुन येणारे खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच तसेच प्रेक्षकांची गैरसोय होणार नाही, याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी.
सर्व संबंधित यंत्रणांनी मैदानावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मैदानावरील जागेचे सपाटीकरण करुन घ्यावे. परिसरात स्वच्छता राहील याबाबत दक्षता घ्यावी. पुरुष आणि महिलाकरीता स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करावी. आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता सुसज्ज रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी. मैदानावर तसेच निवासाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक नेमावेत, अशा सूचना श्री. नावडकर यांनी केल्या.
या बैठकीत भोजन, पाणी, निवासव्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, प्रेक्षकागृह, शौचालय, विद्युत व्यवस्था, बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, कार्यक्रम पत्रिका, मंच व्यवस्था (स्टेज) आदींबाबत चर्चा करण्यात आली.