गोवंशाच्या बेकायदेशीर वाहतुकीला बारामती शहर पोलिसांचा चाप

0
5

गोवंशाच्या बेकायदेशीर वाहतुकीला बारामती शहर पोलिसांचा चाप

दोन जर्सी गायींची सुरक्षित सुटका; पिकअप वाहनासह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामती, दि. ३ सप्टेंबर २०२६ : गोवंश जनावरांची संशयास्पद व नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन जर्सी जातीच्या गायींची सुरक्षित सुटका करण्यात आली. या कारवाईत महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन आणि दोन गायी असा एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मॅकडॉल कंपनीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
गोवंश बचाव कार्य करणाऱ्या टीममधील वैभव थोरात यांच्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढऱ्या रंगाचे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH-13-CU-2064 संशयास्पदरीत्या जात असल्याचे निदर्शनास आले.
माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने संबंधित वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनामध्ये एक काळसर रंगाची आणि एक काळ्या-पांढऱ्या रंगाची अशा दोन जर्सी गायी आढळून आल्या.


कागदपत्रांची मागणी, मात्र समाधानकारक माहिती नाही
वाहनचालक शब्बीर इमाम शेख (रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा) याच्याकडे पोलिसांनी गायींच्या मालकीबाबत, त्या कोठून आणल्या, कोणाकडून खरेदी केल्या, कोणत्या ठिकाणी व कोणाकडे घेऊन जात आहे, वाहतुकीचा उद्देश काय आहे आणि अंतिम गंतव्य कोणते आहे, याबाबत चौकशी केली.
तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेले पशुवैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यावेळी समाधानकारक व पडताळणी करता येईल अशी माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर झाली नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.
वाहतुकीच्या व्यवस्थेबाबतही नियमांचे उल्लंघन
वाहनाची तपासणी केली असता जनावरांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या काही बाबींची पूर्तता झालेली नसल्याचे प्रथमदर्शनी आढळले. जनावरांसाठी आवश्यक पाणी, चारा, प्रथमोपचार तसेच सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
गायींच्या मालकी व खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांचा अभाव, अंतिम गंतव्य व वाहतुकीच्या उद्देशाबाबत समाधानकारक माहिती न मिळणे आणि घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीच्या आधारे गोवंश जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचा वाजवी संशय निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी वाहनासह दोन्ही गायी ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ३६२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(d) तसेच Transport of Animals Rules, 1978 मधील Rule 47, 48, 49, 52, 54 आणि 56 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये महिंद्रा पिकअप वाहनाची किंमत २ लाख रुपये, काळसर रंगाच्या जर्सी गायीची किंमत ३० हजार रुपये, तर काळ्या-पांढऱ्या रंगाच्या जर्सी गायीची किंमत २० हजार रुपये अशी असून, एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही गायींची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षित देखभालीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे.
जनावरांची वाहतूक करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
जनावरांची वाहतूक करताना केवळ त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे पुरेसे नसून त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि कल्याणाची काळजी घेणे ही संबंधितांची कायदेशीर जबाबदारी आहे. वाहतुकीपूर्वी जनावरे प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रे, चारा-पाणी, प्रथमोपचाराची व्यवस्था तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार प्राण्यांना अनावश्यक वेदना किंवा त्रास होईल अशा पद्धतीने अथवा परिस्थितीत वाहतूक करणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे पशुधनाची वाहतूक करणारे वाहनचालक, मालक आणि संबंधित व्यक्तींनी लागू कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्यावी
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश अथवा इतर जनावरांची संशयास्पद वाहतूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी बारामती शहर पोलीस ठाणे किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. प्राप्त माहितीची कायदेशीर पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख आवश्यकतेनुसार गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.
“सजग नागरिकांचे सहकार्य आणि पोलिसांची तत्परता हीच बेकायदेशीर कृत्यांविरुद्धची प्रभावी ताकद आहे. कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्या; मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी बारामती शहर पोलीस सदैव तत्पर आहेत,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई विशाल चौधर आणि पोलीस शिपाई लतिफ इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here