गुणवडीत सिंहगर्जना मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम; पारंपरिक ढोलपथकासह दहा दिवस अन्नदान

0
11

गुणवडीत सिंहगर्जना मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम; पारंपरिक ढोलपथकासह दहा दिवस अन्नदान

गुणवडी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुणवडी येथील सिंहगर्जना मित्र मंडळाने यंदा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा आदर्श घालून दिला आहे. मंडळाचे संस्थापक प्रतीक राजेंद्र साबळे आणि अध्यक्ष ओम लक्ष्मण करचे यांच्या पुढाकारातून यंदा दहा दिवस अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यासोबतच गावात प्रथमच पारंपरिक ढोलपथक आणून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
गुणवडी गावामध्ये प्रथमच सिंहगर्जना मित्र मंडळाने पारंपरिक ढोलपथकाचा उपक्रम राबविला. सण-उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत आनंदोत्सव साजरा करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. मंडळाचे संस्थापक प्रतीक साबळे, अध्यक्ष ओम करचे तसेच मंडळातील सर्व सदस्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच आजारी रुग्ण आणि इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे गावातील इतर मित्रमंडळे व तरुण मंडळांनीही आगामी काळात पारंपरिक ढोलपथक व वाद्यांना प्राधान्य देत सण, जयंती आणि धार्मिक कार्यक्रम साजरे करावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दहा दिवस अन्नदानाचा उपक्रम
सिंहगर्जना मित्र मंडळाने यंदा आणखी एक सामाजिक बांधिलकी जपत दहा दिवस अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. दररोज सुमारे ४०० ते ५०० नागरिक अन्नदानाचा लाभ घेत आहेत. गणेशोत्सवाच्या आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
सण-उत्सव केवळ जल्लोषात न साजरे करता त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन गावात सकारात्मक आणि विधायक वातावरण निर्माण करण्याचा संदेश सिंहगर्जना मित्र मंडळाने दिला आहे. त्यामुळे मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here