गाडी घरासमोर उभी, पण फास्टॅग शुल्क कापले! नागरिकांमध्ये नाराजी
पाथर्डी, २५ फेब्रुवारी २०२५ – तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे प्रवास अधिक सोपा झाला असला तरी, काहीवेळा तांत्रिक त्रुटींच्या फटक्यामुळे सामान्य नागरिक अडचणीत सापडतात. पाथर्डी येथील एका रहिवाशाच्या बाबतीत अशीच एक घटना घडली.
संबंधित नागरिकाची गाडी घरासमोर पार्क असतानाही, त्यांच्या फास्टॅग खात्यातून ₹२६५/- रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. संबंधित वाहन क्रमांक MH42AS0089 असून, पैसे निंबगाव टोल नाक्यावर वजा झाल्याचे दर्शवले गेले. मात्र, त्या वेळी गाडी त्यांच्या दारातच उभी होती, तरी ९९ रुपये कट झाल्याचा फास्टट्रॅग मेसेज आला याचा स्पष्ट पुरावा त्यांनी फोटो आणि स्क्रीनशॉटच्या स्वरूपात दिला आहे.
ही घटना समोर आल्यानंतर, फास्टॅग सेवा पुरवणाऱ्या बँकेकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना “तांत्रिक तपासणी सुरू आहे” असे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून अनेक वाहनचालक अशा प्रकारच्या तांत्रिक त्रुटींचा फटका बसल्याची तक्रार करत आहेत. काहींनी तर, गाडी एका वेगळ्या ठिकाणी असतानाही टोल शुल्क कपात झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.
या संदर्भात वाहतूक तज्ज्ञांनी यावर अधिक चौकशीची मागणी केली आहे. “फास्टॅग प्रणाली सुरक्षित आणि पारदर्शक असायला हवी. जर वाहन टोल नाक्यावर गेलेच नसेल, तर पैसे का कपात झाले? हे तांत्रिक अपयश आहे का, की फसवणूक? याचा तपास होणे गरजेचे आहे.” असे स्थानिक रहिवासी म्हणाले.
सरकार आणि टोल व्यवस्थापन कंपन्यांनी या समस्येवर लक्ष घालून, चुकीच्या व्यवहारांना आळा घालावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. दरम्यान, अशा घटनांबाबत सतर्क राहून नागरिकांनी वेळेवर तक्रार नोंदवावी, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.
