केंद्र शासनाची राष्ट्रीय कृषि बाजार ई-नाम योजनेमध्ये बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीची दुसऱ्या टप्प्यात निवड झाल्याने त्या
अनुषंगाने शेतकरी, आडते, व्यापारी व कर्मचारी यांना ई-नाम संदर्भात माहिती देण्यासाठी दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी ई-नाम कार्यप्रणालीचे प्रशिक्षणाचे आयोजन
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीतील मुख्य कार्यालयाचे अजित सभागृहात करण्यात आले
होते.
यावेळी भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ई-नाम विभागाचे मार्गदर्शक श्री. रंगनाथ कटरे यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितींना एलसीडी स्क्रीन वर संपुर्ण ई-नाम प्रणालीची माहिती दिली.
ई-नाम राष्ट्रीय बाजारद्वारे बाजार समितीत शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्री करावा असे आवाहन करून केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार आहे. तसेच यामुळे शेतक-यांना वेळेत शेतमालाचे ऑनलाईन पेमेंट मिळणार आहे.
ई-नाम मुळे शेतक-यांचे शेतमालास योग्य भाव मिळणे, शेतमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे तात्काळ पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे तसेच राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे.
त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात गावांतील शेतकरी उत्पादक कंपनी यांना शेतमालास राष्ट्रीय स्तरावर देखील बाजार पेठ उपलब्ध होणार असून यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रक्कमाबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय येथे ही माहिती देणेत यावी. या योजनेतील लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड झेरॉक्स, बँकपास बुक झेरॉक्स, मोबाइल नंबर अनिवार्य आहे.
सध्या बारामती बाजार समितीचे रेशीम कोष मार्केट मध्ये १००% ऑनलाईन ई-नाम द्वारे इन्ट्रा मंडी व इंटर स्टेट कोष विक्री लिलाव होत आहेत. याचा फायदा रेशीम कोष उत्पादक शेतक-यांना होत असुन शेतक-यांना अचुक वजन व योग्य दर व ऑनलाईन पेमेंट मिळत आहे. समितीने स्थानिक व कर्नाटक, आध्र, पश्चिम बंगाल येथील खरेदीदारांना कोष खरेदीचे लायसेन्स अदा केलेले आहेत. भविष्यात बारामती बाजार समिती तेलबिया व गुळ या शेतमालचे ई-नाम द्वारे लिलाव करणेचा समितीचा मानस आहे अशी माहिती समितीचे उपसभापती निलेश लडकत व सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
यावेळी बारामती बाजार समितीचे सदस्य दत्तात्रय तावरे, बापुराव कोकरे, सतिश जगताप, शुभम ठोंबरे, अरूण सकट तसेच विलास कदम, पणन अधिकारी अजय कुदळे, आदित्य माने आणि बारामती मर्चन्ट असोसिएशचे अध्यक्ष संभाजी किर्वे व व्यापारी निलेश भिंगे, रणजित फराटे, निलेश दोशी आणि कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.