ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक-मालकांनी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा
बारामती, दि .१०: ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक-मालकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामतीचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे.
योजनेच्या लाभासाठी पात्र चालक-मालकांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी अनुज्ञप्ती, बॅज,परवाना, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
मंडळामार्फत वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या चालकांसाठी सन्मान निधी योजना, कर्तव्यावर असताना जीवन विमा व अपघात विमा योजना, आरोग्यविषयक लाभ योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना, कर्तव्यावर असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य योजना तसेच सभासदांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र चालक मालकांनी मडंळाच्या http:ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी.
६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र सभासदांना सन्मान निधी योजनेंतर्गत ₹१० हजारांचा लाभ देण्यात येणार आहे. ३ सप्टेंबर रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात पात्र चालक-मालकांना सन्मान निधीचे धनादेश वितरित करण्यात आले.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक-मालकांनी ऑनलाइन सभासद नोंदणी करुन योजनांचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.



