![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2024/12/1001839536-1024x801.jpg)
अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि.२९: पेरणे फाटा येथे १ जानेवारी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २८) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीदरम्यान हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, प्र. समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहआयुक्त सुरेंद्र पवार, प्रमोद जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
पेरणे येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी येत विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी येत असतात. शासनाच्यावतीने त्यांना बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधांपर्यंत अनुयायांना लवकरात लवकर पोहोचता यावे व त्यांचा लाभ घेता यावा यासाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार करण्यात आले आहे.
हे ॲप https://initiatorstechnology.com/VijayStambhSuvidha.apk
या लिंकवरून डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. या ॲपमध्ये अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांचे गुगल लोकेशन मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ॲपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक त्या सुविधा निवडल्यास त्या सुविधेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुगल मॅपवर दिसतो व इच्छित सुविधेपर्यंत पोहोचणे सोपे जाते, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिली.
0