अडीच वर्षांचा ध्रुव ठरला विश्वविक्रमी; संपूर्ण हनुमान चालीसा म्हणून सर्वांना थक्क केले!
बारामती | प्रतिनिधी
ज्या वयात मुले नीट बोलायला आणि शब्द ओळखायला शिकत असतात, त्या अवघ्या अडीच वर्षांच्या ध्रुव रोहन पवार या चिमुकल्याने संपूर्ण हनुमान चालीसा स्पष्ट उच्चारात म्हणून जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
१२ जानेवारी २०२३ रोजी जन्मलेल्या ध्रुवने २६ डिसेंबर २०२५ रोजी हा पराक्रम केला. त्यावेळी त्याचे वय केवळ २ वर्षे ६ महिने १४ दिवस इतके होते. एवढ्या लहान वयात त्याने आत्मविश्वासपूर्ण आवाजात आणि स्पष्ट उच्चारात संपूर्ण हनुमान चालीसा सादर केली.
ध्रुव हा रोहन अरविंद पवार आणि ऐश्वर्या रोहन पवार यांचा सुपुत्र आहे. घरातील धार्मिक वातावरण, चांगले संस्कार आणि पालकांनी सातत्याने केलेले मार्गदर्शन यामुळे ध्रुवला हनुमान चालीसा पाठ झाली. त्याची विलक्षण स्मरणशक्ती, एकाग्रता आणि भक्तिभाव पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले.
ध्रुवच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल Influencer Book of World Records या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून “Tiny Voice, Timeless Devotion – Complete Hanuman Chalisa Recited at Just 2.5 Years” या विशेष शीर्षकाखाली त्याचा जागतिक विक्रम अधिकृतपणे नोंदवला आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल महाराष्ट्रच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, पद्मविभूषण सुधा मूर्ती, राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल आणि अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी ध्रुवचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नगरसेवक अतुल दादा तरवडे यांनी ध्रुवचा रोख ₹५,००१ चे बक्षीस देऊन सन्मान केला.
अवघ्या अडीच वर्षांच्या या चिमुकल्याने केलेली ही कामगिरी केवळ विक्रम नसून संस्कार, श्रद्धा, सातत्य आणि पालकांच्या योग्य मार्गदर्शनाची प्रेरणादायी कहाणी आहे. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ध्रुवचा हा पराक्रम अभिमानाचा क्षण ठरला आहे.




