





३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण — बारामतीत देशभक्तीचा नवा दीप प्रज्वलित
उपमुख्यमंत्री अजित पवार : “तिरंगा म्हणजे स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचा शाश्वत संदेश”
बारामती, दि. १५ :
नटराज नाट्य कला मंडळाच्या उपक्रमातून उभारण्यात आलेला ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभ आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यात उभारण्यात आला. “हा तिरंगा सदैव तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल आणि नागरिकांना राष्ट्रप्रेमाची जाणीव सतत जागी ठेवेल. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिळालेल्या या अमूल्य देणगीचे जतन आपण सर्वांनी अभिमानाने करावे,” असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
स्वातंत्र्यलढ्यातील बारामतीचा ठसा
बारामती शहराचा स्वातंत्र्य संग्रामातील मोलाचा वाटा अधोरेखित करताना त्यांनी कवीवर्य मोरोपंतांची वारसा, १९४२ चा लढा आणि स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान यांची उजळणी केली. १९७३ साली नगरपरिषदेने उभारलेल्या संविधान स्तंभाचा उल्लेख करताना त्यांनी त्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांच्या शिलालेखाचा इतिहासही सांगितला.
तिरंग्याच्या रंगांचा संदेश
केशरी रंग धैर्य व त्याग, पांढरा शांती व सत्य, हिरवा समृद्धी व विश्वास तर अशोक चक्र कायदा व प्रगतीचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी महात्मा गांधी, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या बलिदानी वीरांचा स्मरण केला.
नटराज नाट्य कला मंडळाचे योगदान
गेल्या ४५ वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय नाट्य महोत्सव, ऐतिहासिक व देशभक्तिपर नाटकांचे सादरीकरण हा अभिमानाचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
इंदोरच्या धर्तीवर बारामतीचा विकास
इंदोर शहराच्या धर्तीवर बारामतीत सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रक दिवे, स्वच्छता मोहिम, अनधिकृत जाहिरात फलक हटविणे, कायदा-सुव्यवस्था राखणे अशा विविध योजनांवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी विधायक सूचना देत विकासात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तिरंगा सर्कल आणि विशेष सेवा पदक
स्वातंत्र्य दिनानिमित्त तीन हत्ती चौकाचे ‘तिरंगा सर्कल’ असे नामकरण झाले. तसेच गडचिरोलीत नक्षलवादविरोधात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ‘विशेष सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात ‘मेरा भारत महान’ देशभक्तिपर कार्यक्रम, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, पत्रकार, नागरिक यांच्या उपस्थितीने वातावरण देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले.