
साप्ताहिक भावनगरी इन साईट : स्टोरी……!
बदलते बारामती – एक प्रेरणादायी कहाणी
(शरद पवारांचे विचार, अजित पवारांचे कृतीशील नेतृत्व आणि सुप्रिया सुळे यांचे योगदान)
बारामती… कधी काळी एक सामान्य शहर वाटणारे हे ठिकाण आज देशाच्या नकाशावर एक वेगळा ठसा उमटवत आहे. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहे – पवार कुटुंबीयांचे दूरदृष्टीपूर्ण राजकारण, बारामतीकरांचे सहकार्य आणि पुढारलेल्या विचारांची एकजूट.
शरद पवार यांच्या दूरदृष्टीने या शहराचा पाया घालण्यात आला. त्यांच्या विचारांतून विकासाचा नकाशा उभा राहिला. त्या विचारांची जिवंत आणि सक्रीय अंमलबजावणी केली अजित पवारांनी. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली बारामतीने शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन, बांधकाम, हॉटेल व्यवसाय, कृषी उद्योग या प्रत्येक क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे.
बारामतीतील बदल घडवणारे घटक –
शैक्षणिक संस्थांची शृंखला – इंजिनिअरिंग, फार्मसी, आयटी, मेडिकल, अॅग्रो यांसारख्या क्षेत्रांत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था इथे आहेत.
आरोग्य सुविधा – आधुनिक हॉस्पिटल्स, तज्ज्ञ डॉक्टर, वेलनेस सेंटर्स यामुळे बारामती आरोग्याच्या दृष्टीने समृद्ध होत आहे.
प्रशासकीय सुविधा – प्रशासकीय इमारती, बस स्थानक, सुसज्ज रस्ते आणि जल व्यवस्थापनासाठी पाणीसाठा तलाव इत्यादी बाबी अजितदादांच्या नियोजनशक्तीची साक्ष देतात.
व्यावसायिक विकास – बिल्डर असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, हॉटेल व्यवसायिक अशा प्रत्येक घटकांनी बारामतीच्या उन्नतीस हातभार लावला आहे.
भीमथडीपासून आधुनिक बारामतीपर्यंतचा प्रवास हा केवळ भौगोलिक नाही, तर वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक रूपांतराचा प्रवास आहे. जुन्या बारामतीची आत्मा आणि नव्या बारामतीचे तेज या दोहोंची सांगड इथे घालण्यात आली आहे.
“करा नदीचा विकास, तर बारामतीचा विकास” – हे वाक्य आज सत्यात उतरले आहे. नदीचे सुशोभीकरण, हरित पट्टे, सुंदर उद्याने यामुळे शहराचा नूरच पालटला आहे.
राजकारणाचा आदर्श – बारामतीचा पॅटर्न
देशाच्या राजकारणाची एक दिशा आहे आणि बारामतीचे एक वेगळेच मॉडेल. येथे राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसून विकासाचा ध्यास आहे. अजित पवार यांनी बारामतीकरांच्या विश्वासास पात्र राहून एक असा विकासाचा मार्ग निवडला की आज बारामती देशासाठी रोल मॉडेल ठरत आहे.
सुप्रिया सुळे यांची संसदीय कार्यक्षमता, विकासावर भर, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम यांमुळे बारामतीने सामाजिक क्षेत्रातही नावलौकिक मिळवला आहे.
आज जेव्हा आपण बारामतीकडे पाहतो, तेव्हा ते एक स्वच्छ, सुंदर, हरित, आरोग्यदायी, शिक्षणप्रधान, प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जाते. हे यश कुणा एका व्यक्तीचे नाही – हे यश आहे विचारांचे, कृतीचे, नेतृत्वाचे आणि जनतेच्या सहभागाचे.
बारामती हे केवळ शहर नाही, तर प्रेरणा आहे…!

संपादक भावनगरी
