राजकारणात धर्माचा वापर : सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

0
171

राजकारणात धर्माचा वापर : सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

देखो जरा देश मे मच रहा बवाल हैं,
मजहब के नाम पर बहुत बुरा हाल हैं।
धर्म जोडता हैं देश को तोडता नही,
फिर क्यू उठ रहा धर्म पर सवाल हैं।

   राजकारणात धर्माचा वापर वाढला आहे,  किंबहुना धर्माच्या आधारावरच राजकारण केल्या जात आहे,  मात्र यामुळे देशाची, समाजाची प्रगती होत आहे की धर्मभेद व जातीयभेद यामुळे अधोगती होत आहे? तसेच हे लोकशाहीसाठी योग्य आहे की अयोग्य? याबाबत मात्र नेते, कार्यकर्ते व जनता यांच्यात मतमतांतर आहे.  प्रत्येक निर्णय व सोयी सवलती आणि हुद्यावरील व्यक्ती असे सर्व काही धार्मिक चष्म्यातून पाहण्याची सवय प्रामुख्याने बहुसंख्य हिंदूं-मुस्लिमांना  पद्धतशीरपणे लावण्यात आली आहे.
     विद्वेषयुक्त चितावणीखोर वक्तव्य, भाषणे यामुळे त्या-त्या धर्माचे लोक संघटीत होतात,  दुसर्‍या धर्माचा द्वेष करतात,  परिणामी त्या-त्या धर्माची बाजू घेणारे पक्ष मतदानदृष्ट्या मजबूत होतात. यामुळेच  प्रतिक्रिया सुरू होतात आणि विखारी भाषणाची स्पर्धा सुरू होते. वेळप्रसंगी भांडणे,  हाणामारी व दंगली होतात.  त्यातून राजकारण तसेच मतांची बेरीज आणि वजाबाकी होते,  असे हे धर्माच्या राजकारणाचे ‘मतदान चक्र' आहे.
           मागील चार महिन्यात महाराष्ट्रात ५० हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले. त्यातून विद्वेष पसरविल्या गेला,  तेव्हा या विरोधात काहीच कारवाई न झाल्याचा आरोप करीत न्यायालयात एक अवमान  याचिका दाखल झाली. त्यानंतर विद्वेषी वक्तव्याचा समाचार घेताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दिनांक २९/ ३ /२०२३ रोजी नोंदविलेले कठोर निरीक्षण आणि राज्य सरकार विरुद्ध ओढलेले ताशेरे विचार करायला लावणारे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राजकारणात धर्माच्या वापरामुळे विद्वेषयुक्त व चितावणीखोर भाषणे, वक्तव्ये केली जात आहे. विखारी भाषणे हे ‘दृष्टचक्र’ असून काही संकुचित वृत्तीचे घटक चिथावणीखोर भाषा करत असतात. विद्वेषी वक्तव्य रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून कारवाईचा बडगा उभारण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. सरकार नपुंसक व शक्तीहिन झाले आहे. ते वेळेवर कोणावरही कारवाई करत नाही. जर हे असे सुरू राहिले तर या सरकारची गरजच काय? असा थेट सवालही सर्वोच्च न्यायालयाने केला. सोबतच जनतेने विद्वेषी भाषणे व वक्तव्यांपासून दूर राहावे, त्यास बळी पडू नये, असा सल्लाही दिला. तर राजकारण आणि धर्म परस्परांपासून विलग होतील. राजकारणात धर्माचा वापर थांबेल. तेव्हाच विद्वेषयुक्त व चिथावणीखोर भाषणे थांबतील, असे परखड मतही व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाने पंडित जवाहरलाल नेहरू व अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांची आठवण करीत त्यांची भाषणे ऐकण्यासाठी अगदी दुर्गम भागातील लोक देखील मोठी गर्दी करीत असत. आता मात्र राजकीय नेत्यांनी धर्म व राजकारण याची सरमिसळ केली असून त्याचा लोकशाहीला मोठा धोका आहे. वास्तविक अन्य समुदायांविरोधात विद्वेषी वक्तव्य करणार नाही, अशी शपथ घेतल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विशिष्ट समाजाला उद्देशून ‘पाकिस्तानात चालते व्हा’, सारखी वक्तव्य कायदे मोडण्याचा प्रकार आहे. विशिष्ट समाजाने हा देश आपला म्हणून निवडला आहे, ते तुमचे बांधव आहेत, देशाचा खरा विकास हवा असेल व महासत्ता बनायचे असेल तर कायद्याचा आदर केला पाहिजे, अशा शब्दात कानउघडणीही केली आहे.
विद्वेषयुक्त भाषणाविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले नसल्याचा आरोप करत महाराष्ट्रसह अन्य काही राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणा विरोधात दाखल अवमान याचिकांवर सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.एम.जोसेफ आणि बी.व्ही.नागरत्न यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण केले आहे. त्यानंतर संपूर्ण देशात यावर विचार मंथन होत आहे.
‘प्रत्यक्षात जो जीता वो सिकंदर’, याप्रमाणे राजकारणात जिंकण्यासाठी, मतांचा गठ्ठा सांभाळण्यासाठी काही ‘फंडे’ करावे लागतात. विद्वेषयुक्त वक्तव्ये व भाषण हा त्याचाच भाग आहे. आम्हीच धर्म रक्षण करणारे, तसेच धर्म बुडण्याची भीती दाखवून, ‘खतरे मे है’ सांगत आक्रमणाची चाहूल म्हणून वेळप्रसंगी हिंसाचार, दंगल घडविली जाते. तर भीतीचे वातावरण करून त्यावर राजकीय पोळी शेकण्याचे प्रकार कमी अधिक प्रमाणात धर्मात व राजकारणात दोन्ही बाजूने केले जातात. नेत्यांच्या भाषणांना गर्दी आजही होते, मात्र ती बहुतांश वेळा गाड्या पाठवून, पैसे मोजून, आमिष दाखवून केलेली असते.
प्रत्येक बाबतीत धर्म पाहण्याची दृष्टी राजकारणाने प्राप्त झाली आहे. कोण काय बोलतो, यापेक्षा तो कोणत्या जातीचा व धर्माचा आहे, हे पाहून त्यावर आक्षेप, आरोप वेळप्रसंगी शिवीगाळ, धमक्या हा प्रकार वाढला आहे. कट्टरवाद कोणत्याही धर्माचा असो, तो घातक असतो, या समजण्यापलीकडे लोक जात आहेत. तर यामुळे देशाचे भले होणार नाही, हेही तेवढेच खरे!
शेवटी राजकारणात समाजापेक्षा राजकारण्यांचेच भले करणारी यंत्रणा कार्यान्वित असते, आणि राजकारणी यासाठी हट्टी, आग्रही व चिवट असतात. तेव्हा जनतेनेच सावध राहावे, या आशयाचा शेर आठवतो…

सियासत के चक्कर में इमान बेच डालेंगे…
वो नेता हैं सहाब…
हिंदू मुसलमान मे हम फंस गये…
तो वो हिंदुस्तान बे

rajeshrajore@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here