बारामतीच्या कन्येची भारतीय महिला अंडर-19 क्रिकेट संघात निवड; श्रीलंका दौऱ्यासाठी संधी..!
बारामती, दि. १२: बारामती तालुक्यातील सावळ गावची कन्या कु. जान्हवी जीवन वीरकर हिची भारतीय महिला अंडर-19 क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली असून, या ऐतिहासिक कामगिरीमुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची नवी भर पडली आहे.

बारामतीच्या इतिहासात प्रथमच सावळ गावातील एका मुलीची भारतीय महिला अंडर-19 संघात निवड झाली आहे. जान्हवीने सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण बारामती तालुका, सावळ गाव आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जान्हवी ही ज्ञानसागर गुरुकुल, सावळ येथील विद्यार्थिनी असून, विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तिने भारतीय संघापर्यंत मजल मारली आहे. तिच्या यशामागे तिचे वडील, प्रशिक्षक आणि कुटुंबीयांचे मोलाचे योगदान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल जान्हवी वीरकर हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी श्रीलंका दौऱ्यात ती दमदार कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप” ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नसून ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.साप्ताहिक भावनगरी च्या वतीने
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!



