१९९६ साली कला शाखेतून बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा डिएड काॅलेजच्या प्रवेशासाठी पुणे आणि रायगडला फाॅर्म भरला तेव्हा फायनल लिस्टमध्ये आपला नंबर लागेल की नाही याची शाश्वतीदेखील नव्हती. पण तेव्हा डी एड,बी एड करणार्या
मास्तरांना लग्नाच्या मार्केटमध्ये फार डिमांड होते हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे नंबर लागलाच तर लवकर नोकरी लागेल या आशेने अनेकजण डि एड करु पाहत होते. मी आणि बाळासाहेब फाळकेंनीही त्याच आशेने डि एडला जाण्याचे ठरविले होते. साधारण जून जूलैच्या सुमारास रायगडमधील अध्यापक विद्यालयांची प्रवेशाची अंतिम यादी अलिबाग येथील जिल्हा परिषदेमध्ये प्रसिध्द होणार असल्याने मी आणि बाळासाहेबांची अलिबागला दुसरी फेरी होणार होती. त्यावेळी आदल्या रात्री पुणे – अलिबाग एसटीमध्ये प्रवासात प्रमोद शिर्के यांच्यासोबत आम्हा दोघांची प्रथमच ओळख झाली. प्रमोद शिर्के हे मुळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांवजवळील बाबुर्डी या गावचे असल्याचे समजले. दौंड आणि श्रीगोंदा हे भीमा नदीच्या काठावर असल्याने एकमेकांचे शेजारील तालुके आहेत. त्यामुळे आता आम्ही तीन गाववाले कोकणात शिकायला जाणारे सोबतीचे हक्काचे मित्र झालो होतो. पुण्याला ओळख झाल्यावर निवांत गप्पा मारता मारता अलिबाग कधी आले ते आम्हाला कळलेही नाही.
अलिबाग एसटीस्टँडवर मुक्कामी एसटी थांबल्यावर आम्ही तिघे वगळता बाकीचे सगळे प्रवासी आपापल्या घरी, मुक्कामाच्या नियोजित ठिकाणी गेले. पण आमचे अलिबागमध्ये ओळखीचे पाहुणे,मित्र वगैरे कोणीच नसल्याने आम्ही तिघेही स्टँडवरच रेंगाळत थांबलो. त्यावेळी असं प्रवासात अनोळखी शहरात,गावात मुक्कामी कोठे गेल्यावर तेथील हाॅटेलमध्ये ,लाॅजमध्ये भाडे भरुन रहायचे असते हे आम्हाला माहित नव्हते. अर्थात ते माहिती असूनही उपयोग नव्हता कारण खिशात हाॅटेलच्या मुक्कामाचे वरखर्चाचे तेवढे पैसेही नव्हते. मग अलिबाग एसटी स्टँड वरच रात्रीचा फुकट मुक्काम करून सकाळी तेथील स्वच्छतागृहात फ्रेश होऊन जिल्हापरिषदेत यादी पहायला पोहोचायचे असे ठरले. आपल्याजवळच्या पिशवीतील शैक्षणिक कागदपत्रे, आपापल्या पाकीटातील उणेपुरे पाचसहाशे रुपये तिघांच्याही दृष्टीने लाखमोलाचे असल्याने त्याची एखाद्या भुरट्या पाकीटमाराने चोरी केली तर काय करायचे या प्रश्नामुळे मनात थोडी धाकधूक होती. मग आपण गप्पा मारत मारत आख्खी रात्र जागून काढूया असे सर्वानुमते ठरले. परंतु एखाद्याला झोप अनावर होत असेल तर काय या माझ्या प्रश्नावर एकावेळी किमान एकाने जागे राहून इतर दोघांनी झोपायचे, असे आलटून पालटून एकेकाने जागे राहून इतर दोघांनी झोपेचा डुलका काढण्याचे ठरले.
या तोडग्याप्रमाणे डोळ्यांत तेल घालून जागे राहून आपल्या बॅगेवर लक्ष ठेवण्यासाठी पहिला क्रमांक आम्ही दोघा खडकीकरांनी मोठ्या मनाने नविनच मित्र झालेल्या श्रीगोंदा येथील प्रमोद शिर्केंना दिला. गप्पा सुरू झाल्यावर आपण शिक्षक होऊन शिक्षणक्षेत्रात चमकदार कामगिरी करुन नाव काढायचे यासाठी डिएड करायचा निर्णय कसा घेतला आहे वगैरे अशा स्वरुपाची गंभीर चर्चा चालू होती. अर्थात आमचे म्हणणे सगळेच खरे नव्हते किंवा सगळेच खोटेही नव्हते. कारण माझ्या डोक्यात त्यावेळी डि एडचे शिक्षण पुर्ण झाल्यावर प्राथमिक शिक्षकाची चांगल्या पगाराची हमखास मिळणारी नोकरी, नोकरीमुळे लगेच लग्नासाठी बायको म्हणुन गावाकडची एखादी सुंदर छोकरी, लग्नानंतर जत्रेसाठी सासूरवाडीला गेल्यावर मला पाहून “आलं बया दाजी” असे म्हणत लाजून आतल्या घरात पळणारी खट्याळ मेव्हणी, शिक्षक जावयाच्या पुढे पुढे करणारे तेथील बाकीचे पाहुणे असे सगळे चित्र समोर दिसत होते. लग्नानंतर बायकोनेही डिएड पुर्ण केल्यावर दोघांनी मग एकाच मोटारसायकलवर रूबाबात बसून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एखाद्या आडवळणी गावातील शाळेत शिकवायला जायचे. दोघांच्या पगारात यांव करायचे,त्यांव करायचे असेही चित्र दिसायला लागले होते. मी त्या स्वप्नातील चित्रांना पक्के करण्यासाठी शिर्के सरांसोबतच्या गंभीर चर्चेकडे दुर्लक्ष करुन स्टँडवरील बाकड्यावरच पाय पसरून निवांत ताणून दिली. दुसर्या दिवशी सकाळी झोपेतून जागे झाल्यावर प्रमोद शिर्के सरांचे तारवटेले डोळे पाहील्यावर आम्हाला समजले की मी आणि बाळासाहेब फाळके या दोघांनीही निवांत झोप काढल्यामुळे नाईलाजाने प्रमोद शिर्केंना एकट्यालाच रात्रभर जागे राहण्याचा नंबर पुरा करावा लागला. शिर्के सरांनी आम्हाला रात्री अनेकवेळा जागे करण्याचा प्रयत्न करुनही आम्ही ढिम्म उठलो नव्हतो. शिर्के सरांना बिलकूल झोप न मिळाल्याने ते आमच्यावर चिडले होते की त्यांच्यावर पहिल्याच दिवशीच्या तात्पुरत्या ओळखीवर पुर्ण विश्वास ठेवून आम्ही दोघे बिनधास्त रात्रभर ताणून दिल्यामुळे त्यांना आमचे आश्चर्य वाटत होते हे मात्र आम्हाला अजूनही समजलेले नाही. बिच्चारे शिर्के सर !
सकाळी जागे झाल्यावर जमेल तसे जमेल तितके वेळेत आवरुन आम्ही रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीत गेलो. पण डि एड प्रवेशाची अंतिम यादी जाहीर व्हायला आख्खा दिवस वाट पहावी लागणार असल्याचे कळले. खरं म्हणजे हे ऐकल्यावर आम्हाला कंटाळा यायला हवा होता पण त्यावेळी त्या इमारतीतूननजर जाईल तिथपर्यंत अथांग पसरलेला समुद्र दिसत होता. तटरक्षक दलाचे हेलिकाॅप्टर टेहळणीसाठी समुद्रावर काहीवेळा घिरट्या घालताना दिसायचे. नारळी पोफळीच्या आकाशाला स्पर्श करु पाहणार्या बागा दिसायच्या. त्यामुळे मस्त सुंदर माहोल झाला होता. माहोल सुंदर व्हायचे अजून महत्वाचे कारण म्हणजे आमच्यासारख्या भावी मास्तरांप्रमाणेच अनेक भावी मास्तरीणबाई आपापल्या वडीलांसोबत प्रवेशाची यादी पहायला आल्या होत्या. त्यांच्याकडे (म्हणजे वडिलांकडे नाही) पाहत पाहत ती दिवसभराची प्रतिक्षा सुखद ठरली.काल रात्री अलिबागच्या एसटी स्टँडवर पाहिलेल्या स्वप्नातील आपली भावी मास्तरीण बायको या गर्दित असेल तर मग आपण जिंकलोच हा विचारही मनात येत होता. अखेर संध्याकाळी पाच सहाच्या सुमारास अध्यापक विद्यालयांची प्रवेशयादी नोटीसबोर्डला लावण्यात आली. ती यादी पाहत असताना हळुहळु अनेकांचे चेहरे पडून पार रडवेले होत होते,तर काहींचे चेहरे मात्र खुलत होते. सुदैवाने इकडे मी, बाळासाहेब फाळके आणि प्रमोद शिर्के तिघांचाही डिएड प्रवेश कन्फर्म झाला होता. त्याच दिवशी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी तीन मास्तरांनी कंबर कसल्याची ऐतिहासिक घटना घडली होती पण दुर्दैवाने त्याची नोंद कोणत्याच पुस्तकात झाली नाही. तर सांगायचा मुद्दा हा की प्रमोद शिर्केसरांसोबतची आमची दोस्ती १९९६ पासूनची आहे.
हा दोस्ताना पुढे नंतरच्या काळातही कायम राहीला. डि एड मध्ये दोन वर्षे प्रमोद शिर्के यांच्या नावापुढे इंग्रजी भाषेमधील प्राविण्य असणारा विद्यार्थी, सासवने डि एड काॅलेजच्या खो खो संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू , शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी अशी बिरुदे प्राध्यापकांनी,विद्यार्थ्यांनी दिली याचा मित्र म्हणून आम्हालाही अभिमानच वाटला.
डि एड पुर्ण झाल्यावर प्रमोद शिर्के सर प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवातीला परभणी जिल्ह्यात काही वर्षे कार्यरत होते. तेथील त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत चमकत आहेत. त्यापैकीच एका विद्यार्थ्याने पुढे डाॅक्टर झाल्यावर परभणीमध्ये नविन हाॅस्पिटल सुरु करताना त्या हाॅस्पिटलचा शुभारंभ शिर्के सरांच्या शुभहस्ते केला यावरुन विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी असणारा आदर जाणवत राहतो. प्रमोद सर नंतरच्या काळात नगरमध्ये रुजू झाल्यावर देखील तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लोकप्रिय झाले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव येथील शाळेत काही वर्षे चांगले काम केल्यानंतर मागील पाच वर्षांपासून ते हंगेवाडी शाळेत कार्यरत आहेत.शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करताना क्रिडा,सांस्कृतिक या प्रत्येक प्रकारच्या उपक्रमांत आघाडीवर राहून घेतलेला सहभाग, इंग्रजी भाषेतील अध्यापनाचे त्यांचे प्रयोग, विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टरचा कौशल्याने केलेला योग्य वापर यामुळे ते नेहमीच चांगले शिक्षक म्हणून चर्चेत राहतात.
सोमवारी श्रीगोंद्यातील चिंबळेजवळील हंगेवाडी या गावी प्राथमिक शाळेत मास्तरांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. चांगल्या मित्राच्या चांगल्या कामात छोटीशी मदत करण्यासाठी आपण आपली वाट थोडीशी वाकडी करायला काय हरकत आहे ?