बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांचे गोवा हाफ आयर्नमॅन ७०.३ मध्ये उत्तुंग यश : वैष्णवी ननवरे अव्वल
ता.८ (प्रतिनिधी) : बारामती आणि परिसरात क्रीडा संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोवा येथील हाफ आयर्नमॅन किताबाला गवसणी घातली.
फाऊंडेशनची सदस्या कु.वैष्णवी सतिश ननवरे हिने वय वर्षे १८ ते २४ महिला या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. या विजयाने डिसेंबर २०२४ मध्ये टापो न्यूझीलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ७०.४ या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन तिला प्राप्त झाले आहे.
कु.वैष्णवी यांच्यासोबतच फाऊंडेशनचे सदस्य तुषार चव्हाण यांनी देखील हाफ आयर्न मॅन किताबाला गवसणी घातली. राहुल पाटील यांनी रिले प्रकारात आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केली.
विशेष म्हणजे जुलै २०२३ रोजी अस्थाना काझकिस्थान येथे झालेल्या फुल आयर्न मॅन स्पर्धेमध्ये कु.वैष्णवी ननवरे यांच्यासह तुषार चव्हाण आणि राहुल पाटील यांनी आयर्न मॅन किताबाला गवसणी घातली आहे.
अधिक , कौतुकाची बाब म्हणजे , कु.वैष्णवी ननवरे हिने काझकिस्थान येथील फुल आयर्न मॅन स्पर्धेत , कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब द्वारे घेण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत आणि आता गोवा येथील हाफ आयर्नमॅन स्पर्धेत अश्या तिन्ही स्पर्धेत , वय वर्षे १८ ते २४ महिला या वयोगटात प्रथम क्रमांक (पोडीयम फिनिशर) हा किताब मिळवून एकप्रकारे हॅट्रिक साधली आहे.
या उत्तुंग यशाबद्दल कु.वैष्णवी ननवरे , तुषार चव्हाण आणि राहुल पाटील या सदस्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सर्व खेळाडूंनी ट्रिपल आयर्न मॅन सतिश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून या यशाला गवसणी घातली आहे.