

पालखी सोहळ्यानिमित्त विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता उपक्रम
बारामती, दि. 27 जून –
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती व बारामती नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय प्रबोधन व स्वच्छता उपक्रम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दि. 26 व 27 जून 2025 रोजी यशस्वीपणे पार पडला.
दि. 26 जून रोजी पालखीचे बारामती शहरात आगमन झाल्यानंतर, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी तणावमुक्ती व व्यसनमुक्ती या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी पारंपरिक भजन व फुगडी या सांस्कृतिक कार्यक्रमांतून वारकरी व स्वयंसेवकांनी एकत्रित सहभाग नोंदवत भक्तिभावात भर घातली.




या उपक्रमाचा दुसरा टप्पा दि. 27 जून रोजी सकाळी पालखी प्रस्थानानंतर राबविण्यात आला. महाविद्यालयाच्या सव्वाशेहून अधिक स्वयंसेवकांनी बारामती नगर परिषदेच्या सहकार्याने शरदाप्रांगण भिगवण चौक, सुभाष चौक, तीन हत्ती चौक व मोतीबाग विसावा केंद्र या प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.
या उपक्रमाचे नियोजन प्रा. अमित दिव्हारे, डॉ. मंगल ससाणे, डॉ. जगदीश सांगवीकर, डॉ. अलका जगताप*, कुंडलिक गवारे, मेघना देशपांडे, नीलिमा देवी व डॉ. मंगेश कोळपकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंकज भुसे व श्री. जावळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमातून समाजप्रबोधन, स्वच्छता व सांस्कृतिक एकात्मता यांचे सुंदर दर्शन घडले.