चाँदशाहवली बाबांचा उरूस आज पासून, बारामतीत धार्मिक व सांस्कृतिक जल्लोषाला सुरुवात. ..!
बारामती, १७ एप्रिल — बारामती शहरात धार्मिक श्रद्धेचा व सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम असणारा हजरत पीर चाँदशाहवली दर्गा उरूस आज गुरुवार पासून तर जल्लोषात सुरू होत आहे. चैत्र पौर्णिमेनंतर आणि हनुमान जयंतीच्या सुमारास भरणारा हा उरूस बारामतीकरांसाठी श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतो. या पार्श्वभूमीवर दर्ग्याभोवती रोषणाई, सजावट व तयारीने धार्मिक वातावरण भारावले आहे.
कुटुंबांचा मान, परंपरेचा सन्मान
या उरसाच्या धार्मिक कार्यात बारामतीतील ढवाण पाटील, चिंचकर, हिंगणे, देशमुख, देशपांडे, आगवणे, कुंभार, पठाण, सय्यद आदी कुटुंबीयांना मान दिला जातो, हे या उरसाचे वैशिष्ट्य! आज गुरुवारी दुपारी २ ते ५ दरम्यान कुरानखानीचा कार्यक्रम पार पडेल.
शाही मिरवणुकीची भव्य तयारी
गुरुवार रात्री ८ वाजता मुजावरवाडा येथून सुरु होणारी मिरवणूक कसबा, जुनी कचेरी, गांधी चौक मार्गे मानकऱ्यांना घेऊन दर्ग्यात दाखल होणार आहे. उरूसाचा मुख्य नैवेद्य शुक्रवारी ता. १८ पार पडणार असून, परिसरात भक्तांचा ओघ सुरू राहणार आहे.
कला, परंपरा आणि खेळ यांचा संगम
शनिवारीईद. दि.. १९ सकाळी वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम धार्मिक भक्तीने भारावला असेल. दुपारी ४ वाजता चाँदशाहवली दर्गा मैदानात कुस्त्यांचे जोरदार आखाडे रंगणार आहेत. स्थानिक पैलवानांसोबत बाहेरून येणारे मल्लदेखील मैदान गाजवणार आहेत.
तमाशाचा ठसका आणि झेंड्याची शान
रात्री अप्पासाहेब पवार मार्गावरील जागेवर रंगतदार तमाशा होणार आहे. त्यानंतर रात्री ११ वाजता दर्यातून झेंड्याची मिरवणूक कसबा, जुनी कचेरी, तांदूळवाडी वेस, गांधी चौक, गुनवडी चौक मार्गे पुन्हा दर्गा परिसरात दाखल होणार आहे.
संपूर्ण परिसर सजला, भक्तांसाठी उत्तम व्यवस्था
दर्ग्याभोवती सजावट, रोषणाई, शीतपेय, प्रसाद व्यवस्था, आणि भक्तांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या जागांवर स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. उरसाच्या सर्व कार्यक्रमांसाठी पोलिस बंदोबस्त, वैद्यकीय पथके आणि नगरपरिषद कर्मचारी तत्पर आहेत.
“चाँदशाहवली बाबा की जय!”
उरसाच्या निमित्ताने बारामती शहर पुन्हा एकदा श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाने फुलून जाणार आहे. हा उरूस म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे, तर बारामतीच्या सामाजिक-सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे!
