आठवणींचे पक्षी
((कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही खास कविता)
आठवणींचे पक्षी
किती खेळायचो आपण
झाडांच्या सावल्यात
किती भांडायचो आपण
नदीच्या पात्रात
बेभान होऊन धावायचो आपण
वा-याच्या वेगात…
आठवतंय?
तू उडवायचा पतंग
मी धरायचे चक्री
करकरीत धाग्यानं बोट
कापलं की…
धरायचास बोट ओठांत
जखमांवर फुंकर घालण्यासाठी..
तरीही
नुसत्या नजरेनं गुंफत रहायचं नातं
अन्
उलगडत जायचं मन
आपल्या नात्याला नव्हतंच कुठलं नाव
नव्हताच कुठला धर्म
नव्हती कुठली जातसगळ्या नात्याच्या पलीकडं असूनही…
किती जवळ होतो आपण
उफाळलेल्या समुद्रासारखा
कधीतरी धडकायचा किना-यावर…
मी टेकवायचे डोके तुझ्या खांद्यावर..
तू थोपटायचास मला
अविरतपणे
उष्ण श्र्वासांनं.. उबदार स्पर्शानं..वितळत जायचं मन
अन्..
थेंब थेंब पाझरायचे डोळे
आठवतय नं?
फूलपाखरांमागं धावतांना
भिरभिरायची तुझी नजर
मला शोधण्यासाठी…
अन् मी वेडी
झाडांच्या मागं दडून बसलेली
तूला धप्पा घालण्यासाठी
पावसाळ्यात…
ओल्या नभांचे पुंजके
झेलत रहायचो आपण ओंजळीत
अन्..
हिमगारा वितळू नये म्हणून
माझ्या ओंजळीत तू तुझी ओंजळ धरलेली…
कसे होते ना ते दिवस?
प्राजक्ताच्या फुलांसारखे
मखमली मोरपिसांसारखे
हळूहळू…धूसर होत गेलो आपण..
त्या दाट धुक्यासारखे
जवळ असूनही न दिसण्याजोगे
तरीही आपण दूर कुठे गेलो?
आजही
मनाच्या कोप-यात …थव्याथव्यानं अलगद उतरतात आठवणीचे पक्षी…
या नात्याला विसरणं जमलं नाही…
अजूनपर्यंत तरी…

©✍🏻अंजली राठोड श्रीवास्तव
करमाळा.७७०९४६४६५३
(व्हॅलेंटाईन डे हार्दिक शुभेच्छा)
©✍🏻अंजली राठोड श्रीवास्तव
करमाळा.७७०९४६४६५३
(व्हॅलेंटाईन डे हार्दिक शुभेच्छा)