कऱ्हा नदीपात्रातील ८ अनधिकृत कत्तलखाने हटवण्याची मागणीबारामतीत गोरक्षकांचे आंदोलन; नगरपरिषदेकडे तात्काळ कारवाईची मागणी

0
5

कऱ्हा नदीपात्रातील ८ अनधिकृत कत्तलखाने हटवण्याची मागणी
बारामतीत गोरक्षकांचे आंदोलन; नगरपरिषदेकडे तात्काळ कारवाईची मागणी
बारामती : शहरातील कऱ्हा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या ८ अनधिकृत कत्तलखान्यांविरोधात पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात आला असून, हे सर्व कत्तलखाने तात्काळ कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी बारामती नगरपरिषदेकडे केली आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या निवेदनानुसार, सन २०२३ मध्ये बारामती नगरपरिषदेकडून संबंधित सर्व कत्तलखान्यांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार हे कत्तलखाने सील करण्यात आले होते. मात्र, काही गोमाफियांनी शासन आदेशाचे उल्लंघन करत सील तोडून पुन्हा बेकायदेशीरपणे कत्तलखाने सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाई-बैलांची अवैधरित्या कत्तल केली जात असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस यांच्या मदतीने वेळोवेळी छापेमारी करण्यात आली असून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे काम शहर पोलीस करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
अनधिकृत कत्तलखान्यांमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून पर्यावरणीय आणि सामाजिक समस्या वाढत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. शासनाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कठोर भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व कत्तलखान्यांवर कायमस्वरूपी कारवाई करून संबंधित गोमाफियांवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी प्रशांत सातव, ज्ञानेश्वर माने, अक्षय देवकाते यांच्यासह अंदाजे १०० गोरक्षक उपस्थित होते.
स्थानिक प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Previous articleप्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here