आधुनिक शेती तंत्रज्ञानासह श्वान स्पर्धा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू…बारामती कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांची उस्फूर्त गर्दी…

0
4

बारामती कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांची उस्फूर्त गर्दी
आधुनिक शेती तंत्रज्ञानासह श्वान स्पर्धा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
बारामती (दि. १९ जानेवारी २०२६) –
बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. नांदेड, बीड, जालना, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी प्रदर्शन परिसर गजबजून टाकला होता.
प्रदर्शनात आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीकडे शेतकऱ्यांचा विशेष ओढा दिसून आला. फवारणी यंत्रे, आंतरमशागतीसाठीची अवजारे, तसेच ठिबक व तुषार सिंचन प्रणाली यांची माहिती घेण्यासाठी शेतकरी उत्साहाने सहभागी झाले होते. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली.
यासोबतच मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन आणि शेडनेटमधील भाजीपाला उत्पादन या विषयांवर तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांनी सखोल मार्गदर्शन घेतले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती कशी फायदेशीर करता येईल, याबाबत अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाल्याचे दिसून आले.
प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरली पश्मी व कारवान जातींच्या श्वानांची स्पर्धा. या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील ५१ श्वान मालकांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट श्वानांची परेड पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.


या श्वान स्पर्धेतील विजेत्यांना ट्रस्टचे विश्वस्त मा. श्री. रणजीत पवार, कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे माजी विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. निवड समितीमध्ये डॉ. बी. एन. आंबोरे, डॉ. ए. व्ही. खानविलकर, डॉ. टी. सी. शेंडे (पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ) आणि श्री. तेजस कळमकर (पुणे) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
एकूणच, आधुनिक शेती तंत्रज्ञान, मार्गदर्शन, अनुभव आणि मनोरंजन यांचा संगम असलेले हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून शेतीच्या आधुनिक वाटचालीस नवी दिशा देणारे ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here