प्रतिनिधी: BhavnagaRi
G-20 परिषदेनिमित्त सुरु झालेली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची वेरुळ व अजिंठा ही अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी सुरु राहणार…
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन अजंठा आणि वेरुळ येथे पर्यटकांसाठी अभ्यागत केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रथम काही तांत्रिक कारणांमुळे आणि नंतर कोरोना महामारीमुळे सदरची केंद्रे मागिल काही कालावधीपासुन बंद ठेवण्यात आली होती.
G-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे भारताचा विकास आणि सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करण्याची अनोखी संधी या निमित्ताने भारतास मिळत आहे. G20 परिषदेच्या पार्श्वभुमीवर सदरची अभ्यागत केंद्रे महामंडळामार्फत सुरु करण्यात आली आहेत. G-20 आणि W-20 च्या सदस्यांची परिषद आणि भेट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेरूळ अभ्यागत केंद्रामध्ये मध्ये दि. 28 फेब्रुवारी रोजी पार दिमाखात पडली.
जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले वेरुळ अभ्यागत केंद्र हे वेरुळ लेण्यांमधील कैलास लेण्यांच्या समोरच साधारणपणे 500 मीटर अंतरावर आहे. ही दोन्ही अभ्यागत केंद्रे सुरु होण्यासाठी मा. श्री. मंगलप्रभात लोढा, मंत्री पर्यटन, महाराष्ट्र राज्य हे अत्यंत आग्रही होते. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री. सौरभ विजय, IAS यांनी ही अभ्यागत केंद्रे G-20 परिषदेपुर्वी पर्यटकांसाठी सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मा. श्री. मंगलप्रभात लोढा, मंत्री पर्यटन, महाराष्ट्र राज्य यांच्या नेत्तृत्वाखाली आणि पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री. सौरभ विजय, IAS, महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक मा. श्रध्दा जोशी-शर्मा, IRS यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल आणि कार्यकारी अभियंता श्री. विनय वावधने यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदरची अभ्यागत केंद्रे आता सुरु झाली आहेत.
या ठिकाणी प्रशस्त वाहनतळ असुन या ठिकाणी 40 बसेस, 100 चारचाकी आणि 200 दुचाकी उभ्या राहु शकतात. सर्वसुविधायुक्त असे 2 ऑडीटोरीयम असुन या ठिकाणी साधारणपणे 250 (125+125) लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. दोन उपहारगृहे असुन या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी 2000 चौमी इतक्या क्षमतेचे प्रदर्शनासाठी हॉल तयार करण्यात आले आहेत. उघडया सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची सुविधा असुन या ठिकाणी साधारणपणे 150 लोकांची बैठक व्यवस्था आहे. म्युरल्स आणि पेंटीग्स साठी प्रदर्शन गॅलरी असुन एका ठिकाणी कैलास लेण्यांची 1/10 या आकारामध्ये विलोभनीय प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी स्थानिक लोकलाकार आणि हस्तकला यांच्या विक्रीसाठी 64 दुकानगाळे तयार करण्यात आले आहेत. पर्यकांसाठी सर्व सुविधांनी युक्त अशी स्वच्छतागृहे, माता – बालक आणि महीलांसाठी स्वतंत्र विश्रामकक्ष / शिशु कक्ष यांची सुविधा आहे.
अजिंठा येथील अभ्यागत केंद्रामध्येही अजिंठा येथील चार मुख्य लेण्या – 1,2,16 व 17 ची प्रतीकृती तयार करण्यात आली आहे. दृकश्राव्य माध्यमातून अजिंठा लेण्यांबद्दल माहिती देणे, वाचनालय, उपहारगृहे, वाहनतळ व भूरेखांकन इत्यादी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात डोम थियटर व दृकश्राव्य थियटरसुद्धा आहेत. या अभ्यागत केंद्रामध्ये एस्केलेटर व लिफ्ट, ई. अशा अत्याधुनिक सुविधाही आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन उपहारगृहांची सोयसुद्धा करण्यात आली आहे.
दरम्यान, लेण्यांचे सौदर्य पाहुन अचंबित झालेले G-20 च्या सदस्यांचे वेरुळ येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोरोना कालावधीनंतर पुर्ननिर्मित केलेल्या पर्यटक अभ्यागत केंद्रामध्ये G-20 आणि W-20 सदस्यांचे ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मा. व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी शर्मा यांचेबरोबरच मा. जिल्हाधिकारी श्री. अस्तिक कुमार पांण्डेय, महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांना डिजीटल क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाचे धडे, टेक्नोलॉजीची देवाण घेवाण आणि क्षमता उभारणीच्या संदर्भातल्या चांगल्या प्रथा सदस्य राष्ट्रांसमोर ठेवण्यात आली. महीलांना केंद्रस्थानी ठेवुन सर्वसमावेशक विकास, लघुउद्योगांचे सशक्तीकरण स्थानिक कलाकुसर जसे पैठणी, हिमरु, इ. अव्दितीय हस्तकला आणि कलात्मक वारसा यांचे प्रदर्शन वेरुळ अभ्यागत केंद्रामध्ये विविध संस्थांकडुन करण्यात आले.
महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. विनय वावधने यांनी अवघ्या 2 महिन्यांच्या अल्प कालावधीत अत्यंत वेगाने आणि कुशलतेने पर्यटक अभ्यांगत केंद्र पुर्ननिर्मित केल्याने महामंडळाच्या मा. व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी शर्मा आणि मा. जिल्हाधिकारी श्री. अस्तिक कुमार पांण्डेय यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. सदरचे अभ्यागत केंद्र यापुढे नियमित सुरु राहावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी या कार्यक्रमादरम्यानच मा. व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी शर्मा यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विविध कंपन्या आणि संस्था, NGO यांचे प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये नव्याने निर्माण झालेल्या A-20 सदस्यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींसमोर मा. व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी शर्मा यांनी महामंडळाची भुमिका विषद करुन सर्वांच्या सहकार्याने हे अभ्यागत केंद्राचे व्यवस्थापन नियमित कसे सुरु राहील याबाबत सविस्तर चर्चा केली. A-20 सदस्यांनी या बैठकीमध्ये महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकताना छत्रपती संभाजीनगर चे पर्यटन आणखी उच्च स्तरावर घेवुन जाण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत, यावर आपले मत व्यक्त केले. मा. चंदशेखर जयस्वाल यांनी आभार मानुन ही बैठक संपन्न झाली.
G-20 आणि W-20 सदस्यांच्या भेटीसाठी अद्यावत करण्यात आलेली अजिंठा आणि वेरूळ ही अभ्यागत केंद्रे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली असुन पर्यटकांना या केंद्रांमुळे चांगली सुविधा मिळणार असुन छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनास आणि स्थानिक कलाकार, हस्तकला यांना मोठी चालना मिळेल. यास्तव, पर्यटकांनी अजिंठा आणि वेरूळ या अभ्यागत केंद्रांमध्ये जास्तीत जास्त भेट देवुन पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

