HomeUncategorizedआई भवानी वर श्रद्धा जरुर ठेवा.तिथं नतमस्तक ही व्हा.कारण ती भवानी ती...

आई भवानी वर श्रद्धा जरुर ठेवा.तिथं नतमस्तक ही व्हा.कारण ती भवानी ती दुर्गा नुसती एक मूर्ती नाही तर हजारो वर्षांपासूनच्या पूर्वजांनी आपल्या समोर तो मांडलेला एक इतिहास आहे

‘ती’ आणि महिषासुरमर्दिनी…

“सर्वमंगलमांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके
शरण्यै त्रम्बके गौरि
नारायणि नमोsस्तुते!”
आई जगदंबेचं नवरात्र मोठ्या जल्लोषात साजरा होतोय.गोष्ट मोठी आनंदाची आहे.ज्याच्या त्याच्या श्रध्देची आहे.
गेल्या दोन वर्षांत आपण घाबरून दचकून जगत होतो.
पण ती मागील दोन वर्ष विसरण्यासारखी मुळीच नाहीयेत.
आई भवानी वर श्रद्धा जरुर ठेवा.तिथं नतमस्तक ही व्हा.कारण ती भवानी ती दुर्गा नुसती एक मूर्ती नाही तर हजारो वर्षांपासूनच्या पूर्वजांनी आपल्या समोर तो मांडलेला एक इतिहास आहे.काळाची पावलं किती तर शतकं आधी आपल्या पूर्वजांनी ओळखली होती.त्यांना माहित होतं की पुढे येणारा काळ हा महिलांसाठी जोखमीचा असेल आणि म्हणूनच एक प्रतिकात्मक रूप म्हणून अष्टभुजा महिषासुरमर्दिनी देवीची निर्मिती केली गेली.(ही गोष्ट काल्पनिक आहे की सत्य घटनेवर आधारित आहे या खोलात न शिरता आपण फक्त समाजीतील महिलांचा इथं विचार करूया)
घरातील प्रत्येक स्त्री सुरक्षित रहावी
. घराबाहेरील स्त्री सुध्दा आई बहिणीच्या रुपात दिसावी.समाजातील प्रत्येक नारीचं पूजन (समाजात बरोबरीचं स्थान या अर्थानं)व्हावं, आणि थोडा वेळ तिनं सैल मनानं वावरावं, मंदिरात जाऊन वेळ घालवावा. हाच एक हेतू नक्कीच असेल अशी मंदिरे उभारण्यात आणि गाभाऱ्यातल्या दुर्गेची स्थापना करण्यात.
ती आणि महिषासुरमर्दिनी ही दोन्ही रुपं तिचीच.रोज खडतर आयुष्य जगायला तिला किती लढावं लागतं? हे विसरण्या इतपत आपण कृतघ्न नाही आहोत.
ती घरातून बाहेर पडते पैसे कमावण्यासाठी.. बाहेरुन घरांत येते पुन्हा जुंपण्यासाठी ..कसला प्रचंड ताण ती सहन करत असते.
त्यातही ती विधवा,अपंग, गरीब, घटस्फोटीत असेल तर हा सगळा भार पेलत ती तिची लढाई लढत राहते. ती कमावणारी नसेल,ती गृहिणी असेल मग तर ती चोवीस तास उपलब्ध असेल असेच सारे तिला गृहित धरुन चालतात. मधुकैटभ,रक्तबीज, महिषासुर सारख्या राक्षसांचा /समस्यांचा वध करणं खरंच सोपं असतं का?तरीही ती सिमोल्लंघना साठी सज्ज होते. ती तिचीच विजयादशमी साजरी करत असते.शमीच्या झाडाखाली तिची तीच शस्त्र ठेवत थोडा विसावा ही घेते.
ती खरंच अष्टभुजा आहे.. दोन हातांनी आठ बाहूचा प्रचंड ताण ती सरसर पेलत राहते.
कशाची अपेक्षा न ठेवता ती आयुष्यभर आपल्या आयुष्यात नवदुर्गा लक्ष्मी असते.
पहिल्या माळे पासून नवव्या माळेपर्यंत तीची आणि आई जगदंबेची नऊ रुपे आपण पाहू.
घटरुपी देहामध्ये वास करणारी ती घटलक्ष्मी बनते.
माता, पत्नी बहीण ,आजी या विविध रुपानं ती आदीलक्ष्मी असते.
संसारात काटकसर करुन पैसा जमवणारी तर कधी पैसा कमावणारी ती धनलक्ष्मी असते.
धान्य वाया जाऊ न देणारी आणि धान्य पिकवणारी तसेच धान्य म्हणजे प्रसाद मानणारी ती धान्यलक्ष्मी असते.
गुरढोरं ,प्राणी यांना सांभाळणारी ती गजलक्ष्मी असते.
संतती सौख्य देते, संततीला जीवापाड जपते, संस्कार देते ती संतानलक्ष्मी असते.
शौर्य ,धाडस झेलणारी वीरमाता असते. ती संकटसमयी सदैव पाठीशी उभी राहते. ती वीरलक्ष्मी असते.
रोजचं आयुष्य धडपडत कशीतरी जगणारी ती शेवटी विजय प्राप्त करते. ती विजयालक्ष्मी असते.
कला ,शास्त्र, प्रबोधन देणारी, सगळ्यांचं जगणं समृद्ध करणारी ती विद्यालक्ष्मी असते.
किती साम्य आहे नाही तिच्यात आणि या नवदुर्गेत!
नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालून ती बाहेर पडली तरीही आपण आनंद का मानू नये? कारण तिच्याच तर मुळे आयुष्य नाही का इंद्रधनुष्यी झालंय.
(पण एखादीला त्या रंगाची साडी नसेल तर वाईट ही वाटून जातं कैकदा )
उपवास करते ती घराच्या भल्यासाठी ,मांगल्यासाठी.आपण उपाशी राहू नये म्हणून अन्नपूर्णा बनते ती.
ती आहे म्हणूनच तर आपलं आयुष्य सजलं आहे. ती गरबा खेळेल.. खेळू द्या. ती मनमोकळेपणानं गीत गाईन..गाऊ द्या. ती आहे म्हणूनच तर आपलं आयुष्य सप्तसुरात नांदत आहे. हे विसरून कसं चालेल?
पण आज भक्तीची,भक्तांची रुपे बदलली आहेत ही गोष्ट थोडावेळ आपण बाजूला ठेवू.
एक स्त्री म्हणून आणि त्यातून ही एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून एक गोष्ट समाजाच्या निदर्शनास आणून द्याविशी वाटते.
ही गोष्ट किती लोकांना पटेल माहिती नाही.किंवा काही लोकं रितसर आपल्या परीनं ही गोष्ट बाजूला ही सारतील.सारु बापडीचे.
पण वैचारिक लोक नक्कीच या गोष्टींचा विचार करतील.
गोष्ट अशी आहे की मला कुणाच्या ही भावना दुखवायच्या नाहीत.
पण एक चित्र मी अजून ही विसरलेले नाही. आणि हे चित्र तुम्ही पण पाहिलंय की…! नाही म्हणायला मी फक्त ते नव्याने सांगते आहे. देवीच्या मंदिरात हजारो भाविकांची प्रचंड गर्दी असते.हातात फळं,नारळ, मिठाई, मिष्ठान्न,अगदी भारीतल्या भरजरी साड्या पैठणी..अगदी सोनं चांदी सुध्दा ते देवीसाठी आणतात.
गोष्ट वाईट नाही.श्रध्देची आहे. मी पण जाते देवी चरणी काही तरी अर्पण करायला. आपण कुठं तरी लीन होतोय ही गोष्ट ही नसे थोडकी.
पण या गोष्टीला..या भावनांना..या श्रद्धेला तडा न जाता याला विज्ञानाची जोड दिली तर..!
पहिली बाजू पाहिली आता दुसरीकडची एक बाजू,एक चित्र मांडायला मला आवडेल.
चित्र खूप वेगळं आहे.जीवाची घालमेल वाढवणारं आहे.
सरकारी/खाजगी दवाखान्यात रुग्णांच्या नातेवाईकांची फळां साठी,बील भरण्यासाठी होणारी तारांबळ आपण कितीदा तरी पाहिली असेल?
अजून एक भयाण वास्तव पोटात गोळा उठावणारं आहे.समाजील दारिद्र्य रेषेखालील कित्येक कुटुंबं अशीआहेत की घरातील महिलांना पुरते वस्त्र नसते.फाटक्या साड्यातही त्या दिवाळी साजरी करताना दिसतात.इतकी ती भयाण विषमता! काळीज पिळवटून टाकते.
आता मुद्द्यावर येते.
एकीकडे मंदिरातील गाभार्यातल्या मूर्ती समोर साडी, फळं खणनारळाची ओटी आपण ठेवतो.
मान्य आहे की ती मुर्ती स्त्री देवतेची आहे.पण खरं तर त्या मुर्तीला या कशाचीही गरज नाही, नसते.
या सा-याची गरज आहे ती समाजातील दुर्बल घटकांना.
या वस्तूंचा देवीला स्पर्श करून आपण या गोष्टी समाजामध्ये योग्य ठिकाणी पोहोच केल्या तर..?
गरजवंताला दिल्या तर..?
आई जगदंबे का खुश होणार नाही? आणि तुमच्या श्रध्देला ही तडा जाणार नाही.
पण यातलं काहीच होत नाही.
हे चित्र बदलायला अजून कितीतरी शतकं जावं लागतील.
मंदिरातील दान पेट्या..साड्यांचा लिलाव या गोष्टी जिथल्या तिथल्या ट्रस्ट च्या अखत्यारीत येतात.
मग त्यांनी तो साड्यांचा लिलाव करायचा की त्या गरजू महिलांना लज्जा रक्षणासाठी तशाच द्यायच्या हा त्यांचा प्रश्न.
आज इतकी मोठमोठी देवस्थानं आहेत की तिथल्या देणग्यांनी विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवू शकेल.शेतक-यांचं भेगाळलेलं जीवन सुधारु शकेल.
सामुदायिक विवाह सोहळे, स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालये ,चॅरिटेबल ट्रस्ट चे दवाखाने उघडून किती तरी या पवित्र देणग्यांचा उपयोग सत्कारणी लागेल.
आई भवानी कितीतरी खुश होईल.
आई जगदंबे चरणी सढळ हातानं आपण दिलेलं दान कोणा वंचितांच्या कामी येतंय.हे अंतरिक समाधान लाख मोलाचं आहे,असेल!
काही ठिकाणी या गोष्टी आता घडू पाहत आहेत.
गोष्ट कौतुकास पात्र आहे.
श्रध्देची जपवणूक करत, अंधश्रद्धेला बळी न पडता आपण मंदिरात जाऊ पण समाजातील वंचित दुर्बल महिलांसाठी ही आपण काही तरी दान देऊन
हा सामाजिक एकोपा जपणारा मानवतावादी नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखानं साजरा करु! काय हरकत आहे?
पटतंय का?
आपणा
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…
©️🖋️ साहित्यिका/सामाजिक कार्यकर्त्या –
अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
[email protected]

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on