बारामतीत अवैध गावठी दारू निर्मितीवर धडक कारवाई; ७ आरोपी अटकेत, एक फरार

0
6

बारामतीत अवैध गावठी दारू निर्मितीवर धडक कारवाई; ७ आरोपी अटकेत, एक फरार

८ ठिकाणी छापे; ११० लिटर तयार दारू आणि ५,१८० लिटर कच्चे रसायन जप्त

बारामती, दि. २८ ऑक्टोबर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती विभागाने अवैध गावठी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई केली. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनगाव, मेखळी आणि वाघळवाडी परिसरात हातभट्टी दारू निर्मितीच्या आठ अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत ११० लिटर तयार गावठी दारू आणि ५,१८० लिटर कच्चे रसायन आढळून आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख १८ हजार ८०० रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
दि. २८ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती, दौंड आणि सासवड विभागांसह एच विभाग, भरारी पथक क्रमांक २ (पुणे) आणि बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली.
कारवाईदरम्यान आढळलेली अवैध गावठी दारू आणि कच्चे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.
कच्च्या मालाच्या पुरवठादारांचा शोध सुरू
अवैध गावठी दारू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कोणाकडून पुरवला जात होता, तो कोणाला दिला जाणार होता आणि या प्रकरणात स्थानिक पातळीवर आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
या गुन्ह्यांचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एम. साबळे (बारामती बीट क्रमांक १), एम. पी. होलम (बारामती बीट क्रमांक २) आणि गिरीशकुमार करचे (बारामती बीट क्रमांक ३) करीत आहेत.
अवैध दारूविक्रीची माहिती देण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील फुगेवाडी परिसरात घडलेल्या विषारी दारूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कुठेही अवैध गावठी दारूची निर्मिती किंवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास ती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाला कळवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here