सुनेत्रा वहिनी पवार यांचे भावनिक आवाहन; ‘दादांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी माझी’

0
6

सुनेत्रा वहिनी पवार यांचे भावनिक आवाहन; ‘दादांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी माझी’

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडज येथे आयोजित प्रचारसभेत सुनेत्रा वहिनी पवार यांनी भावनिक, परंतु तितकीच रोखठोक भूमिका मांडत शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांना आवाहन केले. स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अल्पावधीतच काही जणांकडून वेगळ्या राजकारणाला सुरुवात झाल्याची खंत व्यक्त करत, “दादांनी आपल्याला काय दिले, काय शिकवले आणि समाजासाठी काय उभे केले, याचा विचार करण्याची वेळ आता प्रत्येकावर आली आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत २१ जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर अनेक उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्या सर्व उमेदवारांचे आभार मानत सुनेत्रा वहिनी पवार यांनी निवडणूक प्रक्रियेत दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘दादांनंतर आम्ही पोरके झालो; तुम्ही पोरके होऊ नये म्हणून जबाबदारी स्वीकारली’
आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना सुनेत्रा वहिनी पवार म्हणाल्या, “प्रत्यक्ष राजकारणाशी माझा दुरान्वयानेही संबंध नव्हता. मात्र दादांच्या जाण्याने आमचे कुटुंबच पोरके झाले. तुम्हीही पोरके होऊ नये, यासाठी मी स्वतःला सावरले आणि ही जबाबदारी स्वीकारली.”
अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काही व्यक्तींवर अप्रत्यक्षपणे टीका केली. “या दुःखातून आम्ही अजून पूर्णपणे सावरलेलो नसतानाच माणसे कशी असतात, कोणाचा विचार काय आहे, हे समोर येऊ लागले. ज्यांच्या पाठिशी आपण उभे राहिलो, त्यांच्याकडूनच वेगळे राजकारण सुरू होणे, ही खेदाची बाब आहे,” असे त्या म्हणाल्या.
‘दादांनी केवळ राजकारण केले नाही; माणसं आणि विकास उभा केला’
स्व. अजितदादा पवार यांच्या बारामती आणि परिसराच्या विकासातील योगदानाचा उल्लेख करताना सुनेत्रा वहिनी म्हणाल्या, “दादांनी केवळ आपल्या परिवाराचा विचार केला नाही. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा ध्यास त्यांनी घेतला. समाजमंदिरे, सभामंडपे, मंदिरे, रस्ते, पाणीपुरवठा, शेतीशी संबंधित योजना आणि विविध विकासकामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला.”
“दादांनी अनेक संस्था उभ्या राहण्यासाठी पाठबळ दिले. हजारो कुटुंबांना रोजगाराच्या आणि कामाच्या संधी उपलब्ध झाल्या. गावागावातील नागरिकांशी त्यांनी आपुलकीचे नाते निर्माण केले. त्यामुळे आजही अनेकांच्या मनात ‘आपल्यासाठी हे कोणी केले?’ असा प्रश्न निर्माण झाला, तर त्याचे उत्तर अजितदादा पवार हेच आहे,” असेही त्यांनी सांगितले.
‘आपल्या शेतीला ऊसाला गावाला पाणी कोणामुळे आले, याचाही विचार झाला पाहिजे’
विकासकामांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना सुनेत्रा वहिनी पवार यांनी थेट सवाल उपस्थित केला. “चार जणांनी रानात चार घरे बांधायची आणि तिथे वीज किंवा इतर सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून दादांच्या नावाने बोंब मारायची, हे योग्य नाही. बारामतीत पाणी कोणामुळे आले, विकासाची ही प्रक्रिया कोणी उभी केली, याचाही विचार झाला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक गावात विकासकामे झाली आहेत. मात्र आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारा आणि त्यांच्या अडचणी समजून घेणारा लोकप्रतिनिधी आवश्यक आहे. दादांनी स्वतःच्या घरापेक्षा जनतेच्या प्रश्नांना अधिक महत्त्व दिले. लोकांसाठी आयुष्य झोकून देऊन काम करूनही ‘दादांनी काही केले नाही’ असे बोलले जाते, याचे दुःख वाटते.”
‘दादांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार’
अजितदादा पवार यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करताना सुनेत्रा वहिनी म्हणाल्या, “जनतेच्या अनेक अपेक्षा दादांकडून होत्या. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. शेतकरी, गावागावातील नागरिक आणि सर्व समाजघटकांच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहीन.”
“मागे काय झाले, याची मला माहिती नाही; मात्र आता पुढे काय करायचे, याची जबाबदारी माझी आहे. यापुढे गावासाठी जे काही आवश्यक असेल, त्यासाठी मी तुमच्यासोबत उभी राहीन. तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी राहण्याची माझी भूमिका कायम राहील,” असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.
‘चोपडसकरांनो, आता तुम्हीच ठरवा!’
सभेच्या समारोपावेळी सुनेत्रा वहिनी पवार यांनी मतदारांना थेट आवाहन केले. “चोपडसकरांनो, आता निर्णय तुम्हीच घ्या. दादांनी आपल्याला काय शिकवले, त्यांनी समाजासाठी काय केले आणि त्यांच्या विचारांचा वारसा आपण कसा पुढे न्यायचा, याचा निर्णय घेण्याची ही वेळ आहे. कोण तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी उभे राहणार, कोण न्याय देणार आणि कोण तुमच्या प्रश्नांसाठी लढणार, हे तुम्हीच ठरवा,” असे त्यांनी सांगितले.
“मी केवळ वहिनी म्हणून नव्हे, तर दादांच्या विचारांची आणि कार्याची जबाबदारी स्वीकारून तुमच्या पाठीशी उभी आहे. शेतकरी आणि प्रत्येक गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे योग्य निर्णय घ्या आणि दादांनी दिलेल्या शिकवणीला न्याय द्या,” असा भावनिक संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांनी यावेळी विविध स्थानिक प्रश्न सुनेत्रा वहिनी पवार यांच्यासमोर मांडले. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित प्रश्नांच्या पाठपुराव्याचे आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here