अंजनगावच्या ‘एक दिवस गावासाठी’ उपक्रमाला वर्षपूर्ती; नेचर क्लबचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात
अध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ; ‘एक व्यक्ती, एक झाड’चा संदेश
बारामती : गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द, पर्यावरण संवर्धनाची आस्था आणि तरुणाईला सामाजिक कार्याशी जोडण्याचा संकल्प घेऊन अंजनगाव येथे सुरू करण्यात आलेल्या ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने नेचर क्लब अंजनगावचा प्रथम वर्धापन दिन दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री भैरवनाथ मंदिर सभामंडपात उत्साहात साजरा करण्यात आला.
नेचर क्लबचे अध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या पुढाकारातून दर रविवारी राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमातून गाव स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश सातत्याने दिला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांना आपल्या गावासाठी वेळ देण्याची आणि गावाच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी होण्याची नवी दिशा मिळत आहे.
वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम तसेच पक्षी व पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नेचर क्लब व ग्रामस्थांच्या वतीने स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पर्यावरणप्रेमी मिलिंद मोरे यांचा वृक्षसंवर्धनातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

‘एक व्यक्ती, एक झाड’ हा संदेश देत सूर्यकांत मोरे यांनी क्लबच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. गावातील स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी क्लबच्या प्रत्येक सदस्याने मनापासून दिलेले योगदान हीच या उपक्रमाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. “गावासाठी काम करताना मिळणारे समाधान आणि ग्रामस्थांचा सहभाग हीच आमची ऊर्जा आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
वाढते शहरीकरण व वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून पक्षी व अन्य जीवांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात येत आहेत. त्यामुळे गावपातळीवर पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याचे ॲड. अनिल मोरे यांनी सांगितले.
‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’चे अध्यक्ष समीर बनकर यांनी देशी वृक्षांचे महत्त्व, पक्षी व मधमाशी संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच फाउंडेशनच्या वतीने गावासाठी ३५ देशी झाडे व ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
पाण्याचा जपून वापर करण्याची गरज अधोरेखित करत प्रशांत परकाळे यांनी जलसंवर्धनाचा संदेश दिला. तर अजय बामणे यांनी यापुढील काळात ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमात तरुणांचा सहभाग आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. बापुराव सस्ते व रेवणनाथ परकाळे सर यांनी नेचर क्लबच्या कार्याचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे ‘गाव आपले—जबाबदारी आपली’ ही भावना अधिक दृढ होत असून, अंजनगावात पर्यावरण संवर्धनाची चळवळ लोकसहभागातून आकार घेत असल्याचे चित्र वर्धापन दिनाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.
यावेळी जि.प. शाळेचे केंद्रप्रमुख मचाले साहेब, बाळासो सस्ते, अंकुश खोमणे, मोहन चव्हाण, विजय परकाळे, वैभव मोटे, दत्ता वायसे, लालासो कुचेकर, राजू वायसे, हनुमंत पवार, दादासो कुचेकर, रोहित मोहिते तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सरपंच बाळासो वायसे, प्रकाश बापू परकाळे, बापुराव सस्ते, डायनामिक्स कामगार युनियनचे अध्यक्ष विजय सस्ते, बँक मॅनेजर अनिल वायसे, वायसे मामा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार नेचर क्लबचे सदस्य मंगेश वायसे यांनी मानले.




