सीसीटीव्ही फुटेजने दिला धागा; २ लाख ९० हजारांची रोकड जप्त करत बिटरगुंट्यात शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई

0
11

शिक्रापूरच्या दहा लाखाच्या चोरीचा थेट परराज्यात माग

सीसीटीव्ही फुटेजने दिला धागा; २ लाख ९० हजारांची रोकड जप्त करत बिटरगुंट्यात शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई

शिक्रापूर दि. २

 शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून १० लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याचा माग काढत शिक्रापूर पोलिस थेट आंध्रप्रदेशात पोहोचले. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा येथे कारवाई करत चोरीच्या रकमेपैकी २ लाख ९० हजार रुपये रोख जप्त केले.
        याप्रकरणी अतुल सुभाष जेधे (वय ४०, रा. जेधेवस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती. ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्यांनी क्रेटा कार शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर पार्क केली होती. कारमध्ये ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी काच फोडून चोरून नेली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्यास सुरुवात झाली. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने आरोपीच्या शोधासाठी दोन वेळा आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा गाठले.
पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे अमोल नलगे आणि पोलीस कॉन्स्टेबल मच्छींद्र निचीत यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कप्पराल टिप्पा, बोगल मंडल, बिटरगुंटा येथे शोध घेतला. तपासात रमेश बाबू गोडेट्टी (रा. कप्पराल टिप्पा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता चोरीच्या रकमेपैकी २ लाख ९० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेस कोळी, तुषार भोर, अंकुश कारंडे तसेच पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे आणि पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, राम जाधव, मच्छींद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले सहभागी होते. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत भोसले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here